आम्ही स्त्रीमुक्ती वाल्या (1987)

कुठेही चर्चेला सुरवात करतांना एक मुद्दा नेहमी उपस्थित होतो. स्त्रीमुक्तीवाद असा काही आहे कां? जसा गांधीवाद असतो किंवा मार्क्सवाद असतो किंवा लोकशाही समाजवाद असतो आणि मानवतावाद आशा विचारधारा असल्याचे म्हटले जाते. तशी स्त्रीमुक्तीवादही विचारधारा असू शकते कां?
या प्रश्नाला अनेक उत्तरे मिळतात. चांगल्या शिकल्या सवरलेल्या स्त्रियासुद्धा म्हणतात, कसला आला आहे वाद’? माणसाने माणसाशी समंजसपणाने वागले की झाले. जग नीट चालेल, सासू सुनेची भांडणे होणार नाहीत.  बायको मध्ये वाद होणार नाही. अधिकारी आणि हाताखाली काम करणारे यांच्यात सामंजस्य  राहील. प्रत्येकाने नेमून दिलेली कामे केली की, सगळ्या समाजाची घडी नीट बसेल.”
शिकले सवरले पुरुष म्हणतात, “स्त्रियासुद्धा माणूसच आहेत. त्यामुळे मानवाचा विकास, मानवाची प्रगती यासाठी जी विचारधारा प्रयत्नशील असते ती स्त्रियांसाठी सुद्धा उपयोगी पडेल. स्त्रीमुक्तीवाद अशा वेगळ्या विचारधारेची गरजच काय ?”
याहून वेगळी प्रतिक्रिया असते ती सर्वसामान्य स्त्रियांची. त्यांच्या रोजच्या जीवनातील गुंतागुंतीमध्ये त्या इतक्या अडकलेल्या असतात. की त्या त्या प्रश्नांना तेथल्या तेथे उत्तरे शोधण्याचा त्यांचा  प्रयत्न असतो. हे उपाय प्रत्येकीसाठी वेगवेगळेच असू शकतात. कारण प्रत्येकीच्या भोवतालची परिस्थिति वेगळी. त्या त्या बाईची झगडण्याची कुवत वेगळी. प्रत्येकीला असणारे उपलब्ध पर्याय वेगळे. या सर्व विविधतेमध्ये इतके हरवून जायला होते की, आपण जी कृती करतो. जे निर्णय घेतो. त्याच्या पाठीमागे काही विचारधारा असू  शकते. किंवा आहेच याचे भानही त्या बाईला नसते. ती सहज म्हणून जाते, “मी बाई, स्त्रीमुक्तीवाली नाही.”
काही नामवंत लेखिका सुद्धा अगदी आग्रहाने सांगतात, “मी स्त्रीमुक्तीवादी फेमिनिस्ट नाही.” अंगावरील झुरळ झटकावे तसा फेमिनिस्ट शब्द प्रयोग त्या झटकून टाकतात.
याच्या उलट एखादा पुरुषही  पुढे येतो आणि म्हणतो, “मी स्त्रीमुक्तीवादी आहे.” आणि लोक त्याला हसतात. जणू स्त्रीमुक्तीवादी असण्यासाठी जन्माने आणि कर्माने स्त्रीच असावे लागते.
दूसरा एखादा पुरुष हात झटकून सांगतो,”मी नाही माझ्या बायकोला छळत. तिला वाटेल ते करण्याची परवानगी देतो.” आणि त्याच्या विनोदाचे सर्व हसून कौतुक करतात.
शेतकरी संघटना चांदवड येथे दहा हजार स्त्रीयांचे शिबीर घेते आणि नंतर एक लाख स्त्री-पुरुषांच्या उपस्थितीत खुले महिला अधिवेशन होते. स्त्रीमुक्ती चळवळीला खरी दिशा मिळाल्याची घोषणा तेथे केली जाते. इवल्या इवल्या स्त्रीमुक्तीवादी गटांचे कार्य कस्पटासमान लेखले जाते. प्रचंड संख्येने स्त्रिया मागे आल्या म्हणजे स्त्रीमुक्तीवर अधिकारवाणीने बोलण्याचा परवाना मिळाला असे मानले जाते.
असा हा स्त्रीमुक्तीवाद लवचिकपणे वापरला जात असतो. एक गोष्ट मात्र नक्की की दहा वर्षापूर्वी हा शब्दही कोणाला माहित नव्हता. आज हा शब्द तरी लोकांच्या जिभेवर खेळायला लागलाय. कधी धूर्तपणाने, कधी मुत्सद्दीपणाने, कधी अज्ञानाने आणि कधी अगदी प्रामाणिक या कल्पनेचा वापर केला जातो. याचा अर्थ एक नक्की आहे की या शब्द प्रयोगाने कुठेतरी स्त्रियांच्या मनाच्या तारा छेडल्या जातात हे लक्षात आलेले आहे.
परंतु हे सगळे जे म्हटले जाते ते बाहेरची माणसे म्हणताहेत. ही माणसे काही एक सूत्र धरून चालली आहेत. त्या सूत्रामध्ये कोठेतरी स्त्रीमुक्तीवादाला जागा करून देत, त्या सुत्राला  फारसा धक्का न लागेल अशा पद्धतीने  ठाकठोक करून बसवत त्यांचा मार्ग आक्रमक करण्याचे त्यांचे लक्ष आहे.
याउलट मला वाटते सर्वसामान्य स्त्रियांनीच स्वत:च्या आयुष्यामध्ये, अनुभवांमध्ये डोकावायचे ठरविले तर त्या आतली माणसे होतील. आणि स्वत:चा विचार करत, त्याची नाळ आजूबाजूच्या परिस्थितिशी जोडण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला तर जी सूत्रे त्यांच्या हाताला लागतील. त्या सूत्रांच्या आधारे त्यांनाच स्त्रीमुक्तीवाद गवसेल. एखाद्या पुरुषाला ही परकाया प्रवेशाची कला अवगत असू शकेल. आणि तोही ज्ञानी होईल. बुद्धाने आयुष्यातील भोग पाहिले आणि बोधीवृक्षाच्या खाली बसून अंतर्मुख होऊन त्यावर विचार केला. आणि त्याला साक्षात्कार झाला. तो बुद्ध झाला. स्त्रियांच्या नशिबी भोग तर असतातच. परंतु अंतर्मुख व्हायला वेळ नसतो. हे अंतर्मुख होणे जर सामूहिक पद्धतीने घडले तर निश्चितच स्त्रीमुक्तीवाद आकार देऊ शकतो. ही सामूहिकता केवळ महिला मंडळातील नसावी, कुटुंबातील नसावी, तर वेगवेगळ्या थरातील स्त्रियांनी एकमेकांशी बोलण्याची संधी घेतली. देवाणघेवाण केली तर अन्यायाच्या जागा तर कळतीलच पण हा अन्याय दूर करण्यासाठी आवश्यक सूत्रे काय आवश्यक बदल काय याचाही वियाचर करावा लागेल. केवळ व्यक्ति व्यक्तीला दोष देऊन भागणार नाही. व्यक्तीच्या हातात अधिकार कसे येतात आणि त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता कशी असते याचाच विचार करावा लागेल.
येथे आपल्याला आग्रहपूर्वक म्हणावे लागते की स्त्री मुक्तीवाद हा एक वेगळा वाद, वेगळी विचारधारणा असू शकते. आजतोंवर ज्या ज्या विचारधारा जन्माला आल्या त्यांनी असा आग्रह धरला की आमची सूत्रे वापरुन ज्या तर्‍हेचा, समाज निर्माण होईल तो सर्व थरातील सर्व मानवांना सुखी करणारा असेल आणि तरीदेखील असे लक्षात येत गेले की कुठेतरी न्यूनत्व राहिलेले आहे. कारण सर्वंकष दृष्टीचा ध्यास घेतला तरी सुरवातीला समाजातील कोणत्या तरी एका गटाचे अनुभव मध्यवर्ती धरुनच हा दृष्टीकोण निर्माण केला जातो. उदा. मार्क्सवादाने शहरी कामगारवर्गाच्या अनुभवांना मध्यवर्ती धरले. मानवतावादाने, परस्परामधील संबंध समानतेवर आधारित असावेत असे म्हटले, परंतु सत्ता कशी  पोसली जाते. याचे विश्लेषण केले नाही.
स्त्रिया तळागाळाशी असल्यामुळे त्यांच्या अनुभवांना प्राथमिक अत्यावश्यक मानले गेले तर त्या आधारे सबंध समाजाच्या व जगाच्या मांडणीचे, घडीचे चित्रण करता येऊ शकते. विचारधारेमध्ये अनेक सूत्रांची गुंफण असते. ही सूत्रे जीवनाच्या कानाकोपर्‍यांतील अनुभवांना स्पर्श करणारी, त्यांचे विश्लेषण करणारी हवीत. स्त्रियांचे अनुभव हे झोपण्याच्या खोलीपासुन ते आंतरराष्ट्रीय व्यापारी जगापर्यंत झेप घेणारे आहेत. आणि म्हणूनच या अनुभवांचे विश्लेषण करून ही सूत्रे शोधून काढणे शक्य आहे. थोडक्यात स्त्रीजातीवरील अन्यायाचे निर्मूलनही केंद्रीभूत कल्पना धरली तर सर्व मानव समाजाच्या विकासाची बीजे या विचारधारेत सापडू शकतात. कोपर्निकसने जशी सूत्रे केंद्रस्थानी कल्पून बाकीचे ग्रह त्याच्या भोवती फिरत असल्याचे क्रांतीकारक सत्य निदर्शनास आणले, तसे  स्त्रीला केंद्रीभूत करून विकासाचे सिद्धांत बांधणे आवश्यक आहे, तरच सुखी समाधानी शांततेवर आधारीत मानवी समाज बांधता येईल असा स्त्रीमुक्तीवादाचा दावा आहे.
जीवनानुभव : उच्चवर्गीय शहरी स्त्री
एकेका थरातील स्त्रीच्या जीवनातील अनुभवांकडे डोकावून पाहिले तर आपल्यालाही ही सूत्रे सापडू शकतील. शहरामधील उच्चवर्गीय  स्त्री घ्या. तिचा नवरा उद्योजक आहे. किंवा ती स्वत: उद्योजक आहे. सुखवस्तूपणा आहे. चैनीच्या वस्तु उपलब्ध आहेत. भौतिक सुख हात जोडून उभी आहेत. आणि तरीसुद्धा जीवनात अशा अनेक जागा आहेत की तिला अस्वस्थपणा येतो आहे. कौटुंबिक बाबतीत मुलगा नाही म्हणून सातत्याने टोचणी होऊ शकते. पहिल्या तीन मुली झाल्या असतील तर चवथ्या वेळी गर्भजल परीक्षेचा आग्रह धरला जाऊ शकतो. एका परीने ही परीक्षा संयुक्तिक वाटते. तंत्रज्ञान विकसित होत  चालले आहे तर त्याचा फायदा घेऊन मानवी जीवन सुखी करण्यामध्ये काय चूक आहे? या प्रश्नाला उत्तर देणे कठीण जाते.
येथे स्त्रियांनी सावध रहाणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान चांगले की वाईट नंतर ठरवू. सर्वात महत्त्वाचा  प्रश्न येतो सुख कशाला म्हणायचे? मुलगा होणे म्हणजे सुख, मुलगी होणे म्हणजे दु:ख! कोणी ठरविले? का ठरविले? याची उत्तरे शोधायची म्हणजे मानववंश शास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. त्यातून लक्षात येते की आज जे पुरुषाला म्हत्त्व आहे ते पुर्वीच्या काळी नव्हते. वेगवेगळे समाज वेगवेगळ्या पद्धतीने राहत होते. याचा अर्थ असा की आज जे स्त्रीला दुय्य्म स्थान आहे, आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या तो नैसर्गिक कायदा नाही. स्त्री बदलू शकते. बदलत आलेली आहे.
या सुखवस्तू बाईला जेव्हा निर्णय घ्यावा लागेल तेव्हा कोणते सूत्रे उपयोगी पडू शकेल? ताबडतोबीने अर्थात तडजोडीचे सूत्र उपयोगी पडेल. सासूबाई, नवरा आग्रह करतो व म्हातारपणी सांभाळायला मुलगा हवा नं, संपत्तीला वारस मुलगा हवा नं, तेव्हा गर्भजल चाचणी करून घ्यायची आणि गर्भ मुलीचा निघला तर गर्भपात करून घ्यायचा.  हे  तडजोडीचे सूत्र वैयक्तिक आयुष्यात ठीक आहे. परंतु जरा व्यापक, विचार केला तर चित्र काय आहे? आधीच स्त्रियांना समाजात मान कमी. आपणच आणखी एका स्त्रीला जगात येऊ घ्यायला नकार दिला तर आपणही जगरहाटीत सामील झालो. शिवाय स्त्रियांची लोकसंख्या कमी आहे. ती आणखी कमी होत जाईल.
दुसरे असे की स्त्रीने आजपर्यंत जीव जगवायचे काम केलेले आहे. तेव्हा निसर्गाच्या क्रमामध्ये फार मोठी ढवळाढवळ करणारे, जीव जन्मालाच येऊ नये म्हणून मदत करणारे हे तंत्रज्ञान वापरायचे कां? गरज असेल तर गर्भपात करण्याचे तत्व मान्य झालेले आहेच. परंतु उच्च लिंगाचीच माणसे जन्माला यावीत म्हणून जे गर्भपात केले जातात ते लिंगभेदावर आधारित नाही कां? लिंगभेद मान्य करायचा कां? दुसर्‍याने कमी लेखणे वेगळे, पण स्वत:च स्वत:ला, स्वत:च्या जातीला कमी लेखणे हे नैतिक आहे कां? या सर्वांचा विचार ह्या सुखवस्तू बाईला करावा लागेल. सुखवस्तू असली तरी तिच्या मागचे बाईपण तिला स्वस्थ बसू देणार नाही.
दोन गोष्टींबद्दल तिला निर्णय घ्यावे लागतील.
(१) मुलगा व मुलगी यांच्यातील सामाजिक भेदभाव हा नैसर्गिक आहे की, मानवनिर्मित आहे?
(२) तंत्रज्ञानाचा वापर करून निसर्गामध्ये ढवळाढवळ करून निसर्गातील समतोल बिघडवून टाकायचा कां? तेव्हा तिच्या अनुभवातून निसर्गातील समतोल बिघडवून टाकायचा कां? तेव्हा तिच्या अनुभवातून ही दोन  सूत्रे ती घट्ट धरून ठेवील.
याच उच्चवर्गीय स्त्रिला उद्योजक म्हणून काम करतांना आणखी एक नैतिक निर्णय घ्यावा लागेल. स्त्री व पुरुष हे जन्माने विषम नाही असे मान्य केले मग मालक व कामगार यांच्यातील विषमताही कशी निर्माण झाली? माणूस जन्माला येतांना भांडवल घेऊन येत नाही. ते पुष्कळदा पिढ्यांपिढ्यांचे संचित असते. किंवा समजा एखाद्या माणसाने स्वकमाईने भांडवल जमविले तरी ते दुसर्‍याच्या कडून काम करून घेऊन आणि आलेल्या उत्पन्नाची विभागणी विषम पद्धतीने करूनच जमविले असले पाहिजे हे उघड आहे. या जगामध्ये आजच्या घडीला संधीची समानता नाही. जे स्त्रीपुरुषांच्या बाबतीत खरे आहे तेच मालक व कामगार यांच्याही बाबतीत. तेव्हा आज जरी मी उद्योजक म्हणून काम करीत असले तरी मालक व कामगार अशी विषमता नष्ट व्हावी व खर्‍या सहकरी पद्धतीने वस्तूंचे उत्पादन व्हावे म्हणून मी प्रयत्न करीत असे सूत्र या स्त्रीला अधिक व्यापक विचारातून मिळू शकेल.   
हुंड्याच्या प्रश्नालाही याच स्त्रीला तोंड द्यावे लागेल. हुंडा ही खंडणीच आहे. लेकीला सुख द्या. म्हणून दिलेली लाचलुचपत आहे. येथे पुन्हा हा प्रश्न उपस्थित होईल, की मुलीला सुख हे स्वत:च्या कर्तुत्वाच्या जोरावर मिळेल की दुसर्‍याचे आश्रित राहून? सुख म्हणजे काय? चांगले चुंगले कपडे आणि गोडधोड जेवण की, स्वत:च्या अंगचे गुण प्रदर्शित करण्याची संधी?
याही अनुभवातून पुन्हा तिला एक सूत्र हाती मिळेल की,  भौतिक सुखाचा सौदा करता येतो, पण आत्मिक सुखाचा सौदा करता येत नाही. माणूस म्हणून जगण्याची अपेक्षा असेल तर ती हुंड्याच्या सौदयाने साध्य होत नाही. किंबहुना ती मारली जाईल. हुंडा देणे किंवा घेणे म्हणजे व्यापारी वृत्तीला शरण जाणे, खतपाणी घालणे. उद्योजक स्त्रीच्या हेही लक्षात येईल की, आजकालचे उत्पादन हे प्रामुख्याने नफ्यासाठी आणि बाजारपेठे विकण्यासाठी तयार केले जाते. यातून प्रामुख्याने व्यापारी वृत्ती वाढते. माणसाची गरज भागविण्यासाठी उत्पादन नसून गरज भागली नाही तरी चालेल पण व्यापार झाला पाहिजे हे तत्व वाढीस लागते. त्याचा परिणाम विवाह, जन्म वगैरे समाजिक बाबतीतही  न झाला तर नवलच. गर्भजल परीक्षेचा उपयोग डॉक्टरांचा धंदा वाढविण्यासाठीही केला जातो. थोडक्यात व्यापारीवृत्तीने चालणारा समाज बदलावा लागेल. वैयक्तिक फायदा- नफा ही तत्वे सोडावी लागतील. तरच सर्व स्त्रियां आणि मान यांचे व्यक्ति विकासाचे इप्सित साध्य करता येईल.
शहरी मध्यमवर्गीय स्त्री :
मध्यमवर्गीय नोकरी करणार्‍या स्त्रीच्या अनुभव विश्वात डोकावल्यास तिची कोंडी अधिकच झालेली दिसते. वाढती महागाई म्हणून नोकरीची आवश्यकता, परंतु आर्थिक स्वातंत्र, स्वावलंबन मात्र नाही नोकरी केली तरी घरगुती कामे, व्यवस्थापन यांची जबाबदारी प्रामुख्याने तिच्यावरच. नवर्‍याने कामे केली तरी सांगकाम्यासारखी. अब्रुची भीती, सामाजिक प्रतिष्ठेची टांगती तलवार, त्यामुळे नवर्‍याने मारले तरी सांगायचे नाही. नोकरीत प्रमोशन मिळाले तरी घ्यायचे नाही.  छ्ंद जोपासायचे नाहीत. नवर्‍याची मत्सरी नजर सतत सांभाळायची.
या बाईला दोन बाबतीत सातत्याने निर्णय घ्यावे लागतील. घरची व नोकरीची जबाबदारी या ताणामध्ये नोकरी सोडून देऊ म्हणून चालणार नाही, नोकरी किंवा इतर काही पण आर्थिक स्वावलंबन म्हत्त्वाचे. तो पैसा कसा खर्च करायचा या निर्णयामध्ये सहभाग हवाच. मुख्य म्हणजे कुटुंबामध्ये लोकशाही असली पाहिजे, हेच सूत्र सातत्याने टिकवून धरले पाहिजे. सामंजस्य म्हणजे बाईने पड खायची, तडजोड करायची, नवर्‍याने मात्र शिरजोरी करायची हे चालणार नाही. बाईचे पैसे, तिचा वेळ, तिचे छ्ंद या तिन्हीचा विचार पतिपत्नी दोघांनी करायचा मी तिला परवानगी देईन ही भावना पतीमध्ये असता कामा नये. पत्नी सुजाण प्रौढ व्यक्ति आहे याचे भान तिने पतीला दिले पाहिजे. याच लोकशाही करण्याचा भाग म्हणजे घरकामामध्ये पतीने योगदान केले पाहिजे. तरच पत्नीला छ्ंद जोपासता येतील. स्त्रीचे कामे व पुरुषाची कामे ही विभागणी बाह्य जीवनात हळूहळू नष्ट होते आहे तसेच कुटुंबाच्या अंतर्गतही हे बदलले पाहिजे. मोलकरीण ही संस्था लयास चालली शिवाय ती मालक-कामगार या विषम संबंधावर अवलंबून असल्यामुळे ती योग्य नाही. हळूहळू ती कमी करत गेले पाहिजे. तेव्हा पुरुषाच्या घरकामात सहभाग हेच सुत्र येऊ शकते.
स्त्रीच्या आर्थिक कमाईचा फायदा असा की गरजेपोटी छळ सहन करत पती बरोबर राहण्याची सक्ती होणार नाही पतीला पत्नीबरोबर खरे प्रेमाचे संबंध प्रस्थापित करावे लागतील.
कामगारवर्गीय स्त्री :
कामगार स्त्रियांना सातत्याने मालक कामगार संघर्षाला तोंड द्यावे लागेल. कामगार स्त्रीला कमी पगार, मंदीची लाट आली की बेकारी, नवीन तंत्रज्ञान आले की, कामगार कपात या गोष्टींना सातत्याने तोंड द्यावे लागेल. युनियन अंतर्गत सतत झगडा द्यावा लागेल. कामगरामधील दारूच्या व्यसनाला तोंड द्यावे लागेल. या सर्व अनुभवातून एक महत्वाचे सूत्र हाती गवसेल. कामगारांमध्ये सुद्धा खूप थर आहेत. स्त्री कामगारांना संघटित उद्योगधंद्यात फारसे स्थान नाही. तेथून त्याची पिछेहाट होतीय. अनौपचारिक असंघटित उद्योगधंद्यात स्त्रियांची भरती मोठ्या प्रमाणात आहे, तेथे युनियन बांधणे शक्य होत नाही. म्हणून वेगळ्या पद्धतीने संघटित झाले पाहिजे. मोठ्या युनियन्सना या कामगारांमध्ये रस नसतो. कारण वर्गणी जास्त मिळत नाही. पण म्हणूनच स्त्रियांनी इतर अनेक सांस्कृतिक प्रश्न घेऊन एकजूट केली पाहिजे. कौटुंबिक मारहाणीचा प्रश्न, व्यावसायिक व इतर आरोग्याचे प्रश्न या निमित्ताने एकमेकींची ओळख वाढविता येईल आणि एखाद्या छोट्या कारखान्याच्या आर्थिक प्रश्नांवर लढतांना ती उपयोगी पडेल. येथे सापडणारे महत्वाचे सूत्र आहे. केवळ आर्थिक व कायदेशीर लढ्यांच्या नादी न लागता, मोठ्या कामगार संघटनांवर भरोसा न ठेवता स्वत:ची ताकद स्वत: वाढविणे. स्त्री कामगार म्हणून आपले अस्तित्व वेगळे आहे. आपण आधिक असुरक्षित आहोत. याचे भान ठेवणे लढ्याचे नवीन मार्ग चोखाळणे. यातून व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळविणे आणि भविष्यकालीन जगात सहकारी उत्पादन हाच मार्ग राहील व शोषणाचा अंत होईल हे सत्य ओळखणे.
वरील तिन्ही अनुभवविश्वातील सूत्रे ही एकमेकांना सुसंगत आणि एकमेकात गुंफलेली अशीच आहेत हे लक्षात येईलच.
ग्रामीण स्त्री-श्रीमंत शेतकरी :
ग्रामीण भागातील आज मुख्य तीन थर आहेत. ज्यांच्या शेतात बाजारपेठेसाठी पीक काढले जातंय, ऊसाच्या कारखान्यावर त्यांची सत्ता आहे. जे शेतमजूर लावून शेती करून घेतात. त्यांच्या घरच्या स्त्रियांच्या अंगावर सोने आहे. मात्र प्रतिष्ठेच्या नावाखाली त्यांना बाहेर पडण्याची बंदी आहे. अजूनही या समाजामध्ये जमिनीचा वारसा मुलींला जात नाही. आर्थिकदृष्ट्या ती पूर्ण पतीवर अवलंबून आहे. या स्त्रीचे मुख्य सूत्र राहील ते कौटुंबिक शेतीच्या व्यवस्थापनात सहभागाचा अधिकार मिळविले त्याचबरोबर केवळ बाजरासाठी पिके नकोत. गरजेपुरते अन्नधान्य उगविले पाहिजे, हाही आग्रह तिला धरावा लागेल. बाजारतील भावांची चढउतार पाहिली की, घराचे व्यवस्थापन पाहण्यार्‍या बाईला अन्नधान्याची सुरक्षितता आधी भेडसावते. पुरुषाची वृत्ती पैशाकडे धावत असते. एका पिकावर सगळे लक्ष केंद्रीत करायला त्यांची हरकत नसते, भले कितीही धोका असो. सट्टेबाजी, साठेबाजी काहीही करून नफा हे एकच ध्येय असते. बाई जरा दूर असते या मोहापासून तिचे सूत्र असते जीवन जगविणे.
मध्यम व छोटे शेतकरी ;
दुसरा थर मध्यम व छोट्या शेतकर्‍याचा. तिथेही अवस्था हीच स्त्रीच्या नावाची जमीन नाही. पुरुषाची धडपड नगदी पिके घ्यायची. स्त्री म्हणजे, पोरांच्या पोटाला ज्वारी मिळू दे. संक्रांतीला तीळ मिळू दे.” पुरुष जमीन असल्याच्या प्रतिष्ठेत दुसर्‍याकडे मजुरीला जायला तयार नाही पण स्त्री मात्र स्वत:च्या शेतीवर काम करेल, शिवाय जळणासाठी लाकूडफटा गोळा करेल. गुरांसाठी गवत, कोंबड्या पाळेल. अशी बिनमोबदल्याची कामे करून पोटाला हातभार लावेल आणि शिवाय बाहेर मजुरीला जाईल. शेतमजुरी नाहीतर रोजगार हमी योजनेवर मातीकाम. या बाईचे सूत्र असेल, जमिनीला पानी मिळाले म्हणून सरकारने छोटेछोटे बंधारे घालावे, नालाबंडीत करावे, आणि शेतीला पाणी पुरवावे. निदान एका पिकाची तरी शाश्वती असावी. सरकारने झाडे ठेकेदारला तोडू देऊ नये. म्हणजे पर्यावरण चांगले राहील. माती धुपून जाणार नाही. पाऊस पडेल. विहीरीना पाणी राहील. पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडणार नाही. या बाईचे सूत्र आहे ते निसर्गाला धरून राहण्याचे. गढवालमधील चिपको आंदोलन हे त्याचे उदाहरण आहे. पुरुषांनी ठेके घेतले आणि जंगल तोडून फायदा मिळविण्याची स्वप्ने पाहली. स्त्रिया झाडांना जाऊन वेढल्या आणि त्यांनी झाडे राखण्याचे आवाहन केले. शेतकरी संघटनेही घोषणा आहे, शेतीमालाचे भाव वाढवा’. बाजारपेठेसाठी पिके कोण काढते? मोठा शेतकरी त्याच्या हातात चार पैसे जास्त पडले म्हणजे त्याच्या पत्नीच्या हातात जातील, तिचा विकास होईल?छोटा शेतकरी आज शेतकरी संघटनेत सामील होतो. कारण त्याचेही स्वप्न आहे नगदी पिके काढण्याचे. पण त्याच्या पत्नीचे काय? ती माऊली पोटाचा विचार करते. “नगदी पिके घेऊन काय करू, आणि ज्वारी विकत घेऊ? की पंजाबचा गहू विकत घेऊ? त्याच्या किंमती वाढल्या तर!” जमीनधारी शेतकरी स्त्रीचे सूत्र पुरुषापेक्षा वेगळे राहील. काही काळ ती वाहत गेली तरी तिचे दूर पल्याचे ध्येय जीवन जगविणे हेच राहील कुटुंबाचे समाजाचे, व्यापारी शेती तिला परवडणारी नाही. उद्या जमिनीला पाणी  मिळाले, तीन पिके काढता आली तर तिसरे पीक कांद्याचे, भाजीपाल्याचे निघेलसुद्धा पारनेर तालुक्यातील राळेगणशिंदीला निघतंय तसे.
भूमिहीन शेतमजूर :
तिसरा थर आहे भूमिहीन शेतमजुरांचा कामगारांसारखी त्यांची स्थिति.त्यातही स्त्रियांना पगार कमी. ठराविक शेतीकामे, स्त्रियांची ठराविक, पुरुषांची गडी माणूस सालदार राहतो. बाईला वर्षभराची नोकरी नाही मुलगा सांभाळायला पाळणाघर नाही. बाईमाणूस असल्याने ठेकेदारांबरोबर लांब स्थलांतर करून जाता येत नाही. तिचा परीघ ठरलेला या बाईचे सूत्र राहील कायम स्वरुपातील कामाची कमी हमी. सरकारी बांधकाम खात्याची कामे, वनीकरणाची कामे इत्यादी काढून तिच्या रिकाम्या हातांची व पोटाची सोय झाली पाहिजे. सारख्या कामाचे सारखा पगार पाहिजे. बाळंतपणाचा भत्ता, रजा वगैरे कायद्यांची अंमलबजावणी पाहिजे. आजकाल शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा शिरकाव होऊन काम कमी होत चालले आहे. त्याचाही बंदोबस्त व्हायला पाहिजे. ऊसासारख्या पिकांना निगाही फार लागत नाही. तेव्हा नगदी पिकांचा फायदा शेतमजुर स्त्रीला फारसा नाही.  याउलट पाणलोट क्षेत्राचा विकास कार्यक्रम राबविल्यास तीन तीन पिके निघतील. आणि या स्त्रियांना अधिक काम मिळू शकेल. त्यामुळे विहीरीना पाणी, सरपणाची सोय वगैरे बिनमोबदल्याच्या कामांना फायदा मिळेल तोही महत्वाचा. तेव्हा शेतमजूर स्त्रीलाही व्यापारासाठी शेती फारशी फायदेशीर नाही हेच खरे.
ग्रामीण भागातील या तिन्ही थरातील सूत्रे एकमेकांना सुसंगत असल्याचे लक्षात आले असेल. तसेच ही सूत्रे शहरी स्त्रियांच्या सूत्रांशीही सुसंगत दिसतात.
स्त्री जीवनाचा मूलस्त्रोत :
थोडक्यात सांगावयाचे तर सर्वात महत्वाचे वास्तव हे आहे की, परंपरागत श्रम विभागणीतून स्त्रीकडे एक महत्वाचे काम आले आणि ते म्हणजे जीव जगविणे. केवळ स्वत:चाच नाहीतर भोवतालच्या सर्वांचा. आपण माकडीणीची गोष्ट ऐकतो. हौदामध्ये पाणी भरत आले तेव्हा प्रथम माकडीणीने मुलाला डोक्यावर घतले. पण नाकाशी पाणी लागल्यावर मात्र मुलाला पायाखाली घातले. बिरबल सांगतो की, तात्पर्य काय? “प्रत्येकाला आपला जीव प्यारा”. बिरबल एक सांगायचे विसरला की माकडीणीच्या जागी माकड असते तर त्याने काय केले असते? शेवटी बिरबलाला माकड, माकडीची तुलना करावीशी वाटली नाही यातच सारे आले.
स्त्री ही दासी नाही आणि देवता नाही. ती गुणांची पुतळीही नाही. तरीही अजून असे दिसते की, स्त्रीमध्ये माणुसकी थोडी अधिक टिकून आहे. गुन्हेगारीचे प्रमाण स्त्रियांमध्ये कमी आहे. दारूसारखी व्यसने नाहीत. भ्रष्टाचार अजून फारसा जमत नाही. याचे कारण स्त्रीचे शरीर मातृत्वाला अनुकूल आहे आणि जन्मजात वात्सल्य भावना तिचे ठायी असते हे नाही. तर ती संगोपन करत आलेली आहे. ती लव्हाळी बनलेली आहे. पुरुष वृक्ष बनला, आकाशाचा वेध घेऊन वाढत गेला. पण वादळामध्ये वृक्षांचा उत्पात होतो. लव्हाळी टिकून राहतात. पतंग तुटून गोते खातात. स्त्रिया पाळेमुळे रुजवून राहतात. त्यातच स्त्रीचे सामर्थ्य दडलेले आहे. मात्र तिच्या ठायी असलेले हे सामर्थ्य झाकोळले गेलेय.  
जगातील एकूण कामापैकी 2/3 काम या आजही स्त्रिया करतात. असे असूनही तिला सांगितले गेलेय तू दुबली आहेस, अबला आहेस, संरक्षणाची तुला गरज आहे. संरक्षण कोणापासून? परपुरुषांपासून शस्त्रांच्या जोरावर स्त्रियांना पळवविण्याची परपंरा मानवाने निर्माण केली, निसर्गाने नाही. आणि मग हा लढाईचा बागूलबुवा दाखवून सुरक्षितता हवी असेल तर आश्रित हो अशी सौदेबाजी केली. आज हा दबाव टिकून आहे.
समाजासाठी एवढे कष्ट करून तिला सत्ता मात्र मिळाली नाही. सत्ता पुरुषाच्या हाती राहिली. त्यातीलच काही पुरुषांच्या हाती अधिक सत्ता एकवटली. वर्ग तयार झाले.
स्त्रीयांचे अनुभवविश्व तपासतांना त्यांच्या मनातील असुरक्षिततेच्या भावनेचा शोध घ्यायचा राहील. स्त्रियांना कसली भीती वाटते? मारहाणीची भीती वाटते.बलात्कारची भीती वाटते? योनिशुचितेच्या कल्पनेमुळे शीलभ्रष्टतेची भीती वाटते. नवर्‍याच्या मत्सराची भीती वाटते, नवर्‍याने टाकले तर, आर्थिक आधार जाण्याची भीती वाटते, सामाजिक बहिष्कारची भीती वाटते, नवरा मुलांची मालकीहक्क हिरावून नेईल याची भीती वाटते. थोडक्यात जीवनाच्या कोणत्याच भागावर आपली नियंत्रण नाही, आपली सत्ता नाही याची त्यांना सतत जाणीव असते.
याउलट त्यांना असे दिसते की, सर्व प्रकारच्या पुरुषांकडे काहीना काही सत्तेचा सामर्थ्याचा अंश असतो. तो कुठून येतो? बळकट स्नायू, सुटका फिरण्याची शक्यता, ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक मोकळा वेळ व प्रवासाची संधी, शिक्षण, शस्त्रे, जमीन, शेतीची आयुधे, कारखाने, घरे, पैसा आणि सामुदायिकरित्या नियंत्रित पोलिसदल, सैन्यदल, न्यायसंस्था, सरकार, पक्षसंघटना, थोडक्यात स्त्रियांना तळागाळाला कामाला लावून रोजच्या जीवनाचे पुनरुत्पादनाचे काम त्यांच्यावर सोपवून निसर्गावर जय मिळविण्यासाठी नवे तंत्रज्ञान शोधून काढणे, युद्ध साहित्याची निर्मिती व शोध यामध्ये पुरूषांचे सर्व व्यग्र आहे. याचा परिणाम आजचे युद्धपिपासू वातावरण, प्रदूषित पर्यावरण, प्रचंड स्पर्धा व हिंसा यामध्ये दिसून येतो.
आणि स्त्रियांना हे सर्व बदलायचे आहे. वर्षानुवर्षे दबलेले जीवन जगल्यामुळे त्यांना स्वातंत्र्य, समता, बंधु-बहिणभाव यांची आकांक्षा तयार झाली आहे. विविध थरातील स्त्रीयांचे वर संगितलेले अनुभव आणि त्यातून निर्माण होणारी सूत्रे असे दर्शवितात की त्यांना आजच्या स्पर्धेच्या, हिंस्त्र जगात सामील व्हायचे नाही. स्वत:ला स्वातंत्र व समता मागतांना इतर सर्व थरांतील विषमता आणि शोषण संपले पाहिजे. याचे भान येणे स्वाभाविक आहे. स्पर्धा व हिंसा ही व्यापारी वातावरणात पोसले जातात याचेही त्यांना भान येतेय . अधिक वस्तु म्हणजे अधिक सुख. अधिक तंत्रज्ञान म्हणजे अधिक सुखाची किल्ली या व्याख्या त्यांना पटत नाहीत. त्या पुरूषांना सांगताहेत,”तुम्ही या नं, आमच्या पातळीवर मुलाना सांभाळायला, भूक भूक करतात तेव्हा भाकरतुकडा घालायला, म्हातार्‍याची सेवाशुश्रुषा करायला. अशावेळी तुमचा अबखल वारू पृथ्वी पादक्रांत करायला निघू शकणार नाही. पृथ्वी जिंकण्यापेक्षा, पृथ्वीचे सौंदर्य राखणे तिला समजून घेणे, आपलीशी करणे हेच अधिक महत्वाचे आहे. थोडेसे आम्हालाही हिंडू दे. मग कुठेतरी गाठ पडेल – गरजांची आणि स्वप्नांची, विज्ञानाची आणि तंत्रज्ञानाची त्यातूनच अधिक मानवी जग निर्माण करता येईल. जे संहारक नसेल पण विधायक असेल. माणूस आणि माणूस बांधणारे असेल, स्त्री असो की पुरुष असो.”
ही सर्व सूत्रे अशा तर्‍हेने एकत्र बांधली की विचारधारा तयार होते, तिलाच म्हणता येईल स्त्रीमुक्तीवाद. ही विचारधारा मान्य करून जेव्हा जग बदलायची तयारी सुरू होईल त्याला म्हणायचे स्त्रीमुक्तीचे राजकारण हेही वेगळे असेल, सध्याच्या पक्षीय राजकाणापेक्षा मात्र सुरवात करायची ती  दिशा ठरवून अनेक सर्व सामान्य स्त्रियांचा प्रवास या दिशेने सुरू झालाय. सगळीच सूत्रे त्यांच्या हातात सापडली आहेत, असे नाहीत. काहींचा शोध चालू आहे. पण जोपर्यंत शोधाची गरज वाटतेय, तोपर्यंत काय हरकत आहे. स्त्रीमुक्तीवादी म्हणून घ्यायला! एखादे वेळेस मध्ये चकवा होईल. अनेकजण स्त्रीमुक्तीची साद घालत आहेत त्यांच्या मागे जावेसे वाटते. शेवटी कोणी प्रेषित, कोणी वाटाड्या भेटला तर निर्धास्त व्हायला होतेच. पण मला वाटते, सोपे उत्तर शोधणे शेवटी महागात पडते. त्यापेक्षा स्वत:च शोध चालू ठेवणे. विविध थरातील स्त्रियांना भेटून त्यांचे अनुभव ऐकणे, निरखणे यातूनच खरी सूत्रे हाती मागणार आहेत. शेवटी प्रत्येकाने स्वत:बुद्ध होणे चांगलेच! अशा प्रगल्भ सुजाण स्त्रीपुरुषाचा मिळून समाज निर्माण झाला तर सत्ता भ्रष्ट होण्याची शक्यता कमी, कारण ती खर्‍या अर्थाने सामूहिक सत्ता असेल. स्त्रीमुक्तीवाद हा भविष्याला खुणावतो आहे.

छाया दातार 

Previous Post Next Post