छेडछाड, स्त्रीपुरुषांमधील आकर्षणाचे एक रूप. शृंगाराचा एक प्रकार की छेडछाड म्हणजे पुरुषाच्या वासनेच्या लवलवत्या जिव्हा, स्त्रीला तिच्या मादीपणाची सतत जाणीव करून देणाऱ्या, तिच्या शरीरसंवेदना मारून टाकणाऱ्या? की छेडछाड म्हणजे छुपी हिंसा, भेडसावणारी, अदृश्य अशा बुरख्याआड स्त्रीला बंद करून ठेवणारी?
ठिकठिकाणी भाषणांच्या निमित्ताने तरुण मुली भेटतात. त्यांच्या मनातील सर्वात वर असणारा प्रश्न आढळला छेडछाडीचा. बरोबरीचे विद्यार्थी, सहकारी यांच्या नजरेतून, शेरेबाजीतुन बाहेर पडून मोकळेपणी वागता येणे, स्वत:च्या आवडीनिवडीचा शोध घेणे शक्य होईल का? मुंबईच्या बाहेरील महाविद्यालयांतील मुलींवर आधीच घरून विवाहाचे प्रचंड दडपण येऊ लागलेले असते. महाविद्यालयात जाणे, केवळ विवाहपूर्व काळातील ‘वेटिंगरूमसारखेच’ समजले जाते. त्यातच आजूबाजूचे हे वातावरण. खूपच गुदमरून जायला होते. काय करता येईल?
आम्ही - ‘स्त्री उवाच’ च्या गटाने शोध घ्यायचे ठरवले. छेडछाड आहे तरी किती प्रकारची? कोणकोण करते? कधीकधी होते? हेतु काय असतो? वरवरचे हेतु कोणते? आणि खोलवर दडलेले कोणते? छेडछाडीचा परिणाम काय होतो? शारीरिक आणि मानसिक दोन्ही? आपल्याकडे छेडछाड पाश्चात्य देशापेक्षा जास्त आहे का? तेथे लैंगिकस्वातंत्र्य बरेच आहे. आपल्या लेंगिकतेवर येथे वर अनेक प्रकारची दडपणे आहेत.त्याचा हा परिणाम?
मुख्यत: महाविद्यालयीन मुलींच्या गटांमध्ये जाऊन याविषयीची चर्चा करण्याचे ठरविले. त्याचसुमारास कामगारवस्तीतील तरुण मुलींच्या अभ्यासशिबिराला जाण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनाही या विषयात खूपच रस आहे असे लक्षात आले. त्यामुळे आणखी नवीन परिणाम लाभल्यासारखे वाटले. मुंबईबाहेरील जिल्ह्याच्या ठिकाणच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीनाही गाठण्याचा थोडाफार प्रयत्न केला.
याच्याच जोडीला तरुण मुलांशीही बोलण्याची संधी घेतली. या गोष्टी का होतात? का केल्या जातात? यांच्या मागची मानसिकता काय असावी? या थांबविण्यासाठी काही खास प्रयत्न करता येतील का? यामध्ये दोन्ही प्रकारची तरुण मुले होती, एक सर्वसामान्य मुले - ज्यांना हे सर्व ‘सहज’,’नैसर्गिक’ वाटत होते. त्याचबरोबर या प्रकाराबद्दल घृणा वाटणारी, काळजी वाटणारी तरुण मुले होती.
सर्वसाधारणपणे छेडछाडीचे तीन प्रकार आढळले. एक नुसते टोमणे किंवा शेरेबाजी करणे, दुसरा प्रकार, अश्लील शेरे मारणे व तिसरा प्रकार शारीरिक लगट करणे हा आढळला. आश्चर्य म्हणजे पहिल्या दोन्ही प्रकारांपेक्षा तिसरा प्रकार हा खूपच सार्वत्रिक आढळला आणि त्याविरुद्ध सर्वात जास्त चीड मुलींनी व्यक्त केली. प्रथम या तिसऱ्या प्रकाराविषयीचे अनुभव बघू. हे स्पर्श सुखाचे प्रकार मुख्यत: मध्यमवयीन व वयस्क पुरुषांकडून केले जातात. यावर कामगार वस्तीतील तरुण मुली वं पांढरपेशा वर्गातील महाविद्यालयीन तरुणी यांचे एकमत होते.अतिशय सभ्य दिसणाऱ्या, वरून शंकासुद्धा न यावी अशा प्रकारच्या पुरुषांकडून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा ता प्रकारच्या शारीरिक लगटीचे प्रकार होतात. एवढेच नव्हे तर मागणीचा उच्चारही अतिशय छुपेपणाने पण पद्धतशीरपणे याच प्रौढ पुरुषांकडून होतो. त्यापैकी काही नमुने असे, “येतेस का? बागेत येणार का?”
“संध्याकाळी भेटणार का?”
“मजा करायची का?”
“मी शिकवेन”
यातून सरळ सरळ एक उद्देश दिसतो, तो म्हणजे तरुण मुलींच्या जाग्या होणाऱ्या शरीरसंवेदनांचा फायदा घेणे, त्यांच्या जागृत झालेल्या कुतुहुलाला फुलावने आणि स्वत: प्रौढ असल्याने समाज आपला संशय घेणार नाही याबद्दल आश्वस्त असणे. अशा परिस्थितीत तरुण मुलीही कदाचित विश्वास टाकण्याची शक्यता अधिक. प्रकरणाचा बोभाटा न होता कुतुहूल शमविता येईल अशी तिची खात्री करून दिली की झाले. असे लंपट अतिरथी महारथी बरेच असतात. आणि एखाद्या बोटचेप्या मुलीच्या शोधात राहतात. त्यामध्ये अनेक हेतु असु शकतात, फुकटात शरीरसुख मिळवणे, कोवळ्या तरुण मुलीचा अनुभव घेणे, छुपेपणाचे सुख मिळवणे, अनुभवीपणाचे अस्तर असल्याने वेळप्रसंगी चलाखीने निसटून जाण्याचे कसबही त्यांना अवगत असते. अर्थात प्रत्यक्षात किती पुरुषांना या प्रकारात यश मिळते हे कळण्यास मार्ग नाही. त्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरील सर्वेक्षणाची गरज आहे. येथे केवळ शारीरिक स्पर्शाच्या उच्चारामागील एका प्रवृत्तीची नोंद केली आहे.
प्रत्यक्ष शारीरिक लगट करून स्पर्शसुखाचे अनेक प्रकार आढळतात. सर्व प्रकारच्या गर्दीची स्थळे, गर्दी असलेली वाहने, कुटुंबातून घडणारे प्रसंग, विवाहकार्यादी गर्दीचे प्रसंग, रात्रीच्या बसेसमधून जाताना शेजारील पुरुष, मागे बसलेला पुरुष यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन घेतलेले स्पर्शसुख, चित्रपटगृहातून घडणारे प्रसंग.
पुण्यातील एका गटातील मुलींखेरीज जवळजवळ सर्वांनी आवर्जून काही ना काही घाणेरडा अनुभव असल्याचे सांगितले. तसेच काहीजणींनी बरोबरच्या मैत्रिणींचे अनुभव बघितले होते.
दुपारी ३ - ४ मैत्रिणी मिळून लिंकिंग रोडला चालत असताना एक माणूस सहज समोरून गेला. काय होतंय हे कळायच्या आत तो निघून गेल्याने आणि त्याच्या या कृत्यावर रस्त्यावरचे लोक हसू लागल्याने, तिला भयंकर शरमिंदे वाटले.
हा प्रसंग फारच सार्वत्रिक असल्याचे लक्षात आले. उपनगरात राहणाऱ्या मुलींना कोणतेही नवीन कोर्सेस घ्यायचे तर रात्री ९ नंतरच घरी परत येता येते. अशावेळी मागून येऊन मिठी मारणे, स्तन दाबणे असे प्रकार सहजी घडु शकतात. क्वचित लोकल गाडीतसुद्धा असे प्रकार होतात.
बसमध्ये पॅसेज लगतच्या सीटवर बसल्यावर एखादा पुरुष जवळ उभा असताना ताठ झालेले लिंग बाईच्या दंडावर घासण्याचा चाळा सतत केला जातो. पॅन्ट असूनही तो स्पर्श जाणवू शकतो. लोकलगाडीचा प्रवास परवडतो पण बसचा प्रवास नको असे अनेकींनी सांगितले.
चित्रपटगृहात तर अंधारात शेजारील स्त्रीची मांडी ही आपल्या शृंगारासाठीच आहे अशी समजूत सार्वत्रिक दिसते.
रात्रीचा प्रवास करताना एस.टी.बसमध्ये शेजारी बसलेला पुरुष रात्रभर अंगामध्ये बोटे खुपसून स्पर्शसुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच मागील सीटवरील पुरुषही पाठ व सीट यामधील फटीचा फायदा घेऊन पाठीवरून हात फिरवून नकोसे करतो.
हे तर सर्वसाधारण प्रसंग झाले. पण आणखीही काही खास परिस्थितीचा फायदा कसा घेतला जातो याचे वर्णन करताना कामगार वस्तीतील बऱ्याच मुलींनी परीक्षेच्या वेळी कॉपी करायला परवानगी देणारा सुपरवायझर शेजारी बसून मांडीवर हात फिरवण्याचा अधिकार सहजी घेताना आढळतो असे सांगितले.
गणपती उत्सवासारख्या धार्मिक उत्सवांच्या वेळी त्तर या प्रकारांना ऊत येतो. चिमटे, छातीमध्ये कोपर खुपसणे, हात धरणे, चापट्या मारणे हे प्रकार वरवर सभ्य दिसणारे लोकही करतात.
रात्रीच्या वेळी बसमधून घरी परत येतेना कंडक्टर हात धरण्याचा प्रयत्न होताना आढळतो. डोळा मारणे तर बरेच नित्यनियमित होत असते.
स्कूटर किंवा मोटरबाईक यांच्यावरून वेगाने जाणारे वीर रस्त्यावरून चालणाऱ्या मुलींना सहजी चापट्या मारून पुढे जात असतात. पुण्यात हे फारच घडते. अनेक नवश्रीमंत मुलं मोटरबाईकवरून मिरवत असतात. स्वतःचा _________ दाखवणे त्यांना फारच आवश्यक वाटते. अशातऱ्हेने असुरक्षित तरुण _____ हिंसेच्या माध्यमातून आपल्या पुरुषार्थाचे प्रयोग करणे त्यांना आवडते. एका मुलीने सांगितले, “मोटारसायकल स्वारांकडून मी जितक्या थपडा आतापर्यंत खाल्ल्या तेवढ्या कधीही माझ्या आईवडिलांकडूनही खाल्ल्या नाहीत.”
थोडक्यात जेव्हा जेव्हा सहज शक्य असेल, फार उघड दिसणार नाही, छुपेपणाने घेता येईल तेव्हा तेव्हा पुरुष स्त्रीशरीराचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. स्त्रीला तिच्या शरीर अस्तित्वाचे भान कोणी विसरू देत नाही.
पॅन्ट खाली करून लिंग दाखवणे ही घटनाही खूपच सार्वत्रिक दिसते. पुणे विद्यापीठातील एकाकी रस्त्यावरही हे घडते, तसेच डेक्कनच्या कॉलेजवर संध्याकाळी ४ - ५ च्या सुमारासही ती घडु शकते.
आता छेछादीच्या दुसर्या प्रकारांचा विचार करू.
टिंगल आणि शेरेबाजी
साधारणपणे तरुण मुले शेरेबाजी करण्यात रस घेतात असे दिसते. कोणती तरुण मुले? असा एक समाज आढळतो की कामगारवस्तीतील, झोपडपट्टीतील तरुण मुले, बेकार तरुण मुलं, वासूनाक्यावर उभी असणारी मुले, थोडक्यात असंस्कृत मुले अशा तऱ्हेची शेरेबाजी, टिंगलटवाळी करीत असतात असे सर्व तरुण मुलींचे म्हणणे पडले. फक्त एक नियम साधारण पाळला जातो, तो म्हणजे ज्या वर्गातील मुले त्या त्या वर्गातील मुलींची छेद काढतात. वर्गाचे अंतर ओलांडणे कठीण जाते असे दिसते. तसेच दुसरा नियम म्हणजे एका चाळीतील, किंवा एका परिसरातील तरुण मुले त्या परिसरातील मुलींची छेड काढत नाहीत. किंबहुना त्यांच्याबद्दल काहीशी स्वामित्वाची भावना बाळगतात व त्यांची छेड काढणाऱ्या दुसऱ्या टोळीशी दोन हात करण्याची तयारी ठेवतात.
या शेरेबाजीसाठी महाविद्यालयांमध्ये खास जागा ठरलेल्या असतात. आणि त्या महत्वाच्या असतात. ती एक प्रकारची सत्तेची ठिकाणेच असतात. महाविद्यालयाचे प्रवेशद्वार, सायकलस्टँड, कँटीन या मोक्याच्या जागा अडविल्या की प्रत्येक मुलीला मुलांच्या नजरांपुढून व शेर्याच्या आतषबाजीतून गेल्याशिवाय शिक्षण घेणं शक्यच नसते. कँटीनमध्ये तर बरंच वेळ या सर्वांचा मारा करता येतो. पुन्हा कँटीन थोडे आडोशाला असते.प्राध्यापकांच्या पहाऱ्याच्या बाहेर, अशा तऱ्हेने असुरक्षित वातावरण तयार होते त्याचा परिणाम म्हणुन मुली मुख्यत: लेडिजरूममध्येच थांबतात किंवा वर्गातच बसतात. थोडक्यात महाविद्यालयाच्या परीसराच्या अनेक भागांमध्ये त्यांना कर्फ्यू जाहीर झाल्यासारखीच असते.
याच्या पुढची पायरी म्हणजे निवडणुका, गदरींग वगैरे मेळावे भरण्याचे प्रसंग. प्रसंग तर पर्वणीच असतात, शेरेबाजीसाठी आणि शारीरिक लगटीसाठी. धुंद वातावरणाचा आणि जल्लोषाचा फायदा घेऊन मुलींना अडवणे, पैजा मारून मुलींची छेद काढणे हे प्रकार घडतात आणि म्हणुन मुली दिवसेंदिवस या प्रकारापासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आधीच घरून सावध राहण्याचा इशारा मिळालेली मुलगी या सर्व वातावरणाने अधिकच स्वतःचे पंख मिटून घेते, आक्रसून जाते.
महाविद्यालयातील हे प्रकार विद्यापीठातील वातावरणामध्ये आढळत नाहीत असे निरीक्षण बऱ्याच जणींनी केले. एकतर विद्यापीठात येणारी मुले ही उच्च शिक्षणाचा हेतु मनात ठेवून आलेली असतात. त्यामुळे त्यांना महत्वाकांक्षा असते. अभ्यासात लक्ष असते. याचा अर्थ सध्याच्या महाविद्यालयात बहुसंख्य मुले ही ‘पडीक’ मुले असतात. अभ्यास कमी अशा शाखांतून असणारी मुले, किंवा गोते खाणारी मुले यांचे प्रमाण या टिंगलखोरांत जास्त असते असे आढळते. याचा अर्थ ज्यांच्यावर फारशी दडपणे नाहीत असे विद्यार्थी स्वतःची लालसा अशी सैल सोडताना दिसतात. नवश्रीमंत विद्यार्थ्यांचे एक मोबाईल कल्चरही तयार होताना दिसतंय. जी मुले एखाद्या संघटनेचा भाग असतात ती छेडछाडीमध्ये आणखीनच निर्धास्तपणे भाग घेतात असे अनेक मुलींनी सांगितले. कारण संघटनेच्या बळावर काहीही निभावून नेता येते.
या उलट पुण्यात दिसणारे परदेशी विद्यार्थी अशी छेडछाड करताना आढळत नाहीत. परदेशात प्रसंगी शोभा होण्याची भीती वाटत असेल किंवा त्यांच्या समाजामध्ये अशी प्रथा नसेल. हे विद्यार्थी ओळख करून घेण्यासाठी, फिरायला नेण्यासाठी उत्सुक असतात. पण हे चोरटे सुख, किंवा पुरुषार्थ मिरविण्याची हौस त्यांना नसावी.
शेरेबाजीतील दुसरा प्रकार म्हणजे अर्वाच्य अश्लीलता. याबद्दल सर्वांनीच चीड व्यक्त केली. खाली एक महाविद्यालयातील अश्लील शेरेबाजीचा तुकडा व दुसरा कामगार वस्तीतील गल्लीतील शेरेबाजीचा तुकडा देत आहोत. म्हणजे दोन्हीकडील प्रवृत्तीमध्ये खरोखरच फरक आहे कां ते तपासता येईल.
महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातून दोन मुली जात आहेत. एकीने स्टोनवॉश्ड जीन व ढगळ टॉप घातला आहे.
“अरे पत्थर धुलाई! पत्थर धुलाई!”
“येते का? येते का?”
“आता नको म्हणते.”
“मग कधी?”
“संध्याकाळी?”
“नाही.नाही.रात्री येते.”
“रात्री कां रे?”
रात्रीच बरं, मजा असते.”
कामगारवस्तीतून तीन मुली जात आहेत अशावेळी खालील संभाषण अनेक वेळा ऐकू येते.
“मधली मला हवी, दुसरी तू घे.”
एकीने तोंड वर करून विचारले,
“आयाबहिणी नाहीत का?”
“आयाबहिणी मेल्या”
याचा अर्थ कोणताही वर्ग असो, स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. आम्ही मुलींना व मुलांना छेडछाडीसाठी वापरल्या जाणाऱ्या अश्लील शब्दांची यादी करायला सांगितली होती.
कामगार वस्तीतील मुलींनी केलेली यादी खालीलप्रमाणे-
“चिकना माल आहे.”
“बत्तीसची आहे.”
“छत्तीसची कि चाळीसची?”
“कपाट?सपाट?चपटी?”
दोन वेण्या पुढे घेतल्या कि
“नागाला दुध पाजा”
अगदी गरोदर बाईसुद्धा या अश्लीलतेच्या शिंतोड्यातुन चुकत नाही. त्यांना खास शब्द.
“टेम्पो’
“बॉलं”
“रेल्वेचा डब्बा”
विवाहित स्त्रीची छेडछाड होत नाही हा समज खोटा. त्यांच्यासाठी खास शेरे
“लायसन्स आहे रे गळ्यात”
“पण घरी असेल. आपण करू शकतो”
“कोन्व्हेंटमध्ये शिकलेल्या तरुण मुलांच्या गटाने त्यांच्यात प्रचलित असणाऱ्या शेऱ्यांची यादी केली.
“व्होअर! बिच! रंडी!”
“व्हॉट अॅन अॅस?”
“व्हॉट गुड बॉक्स”
“क्या कबुतर है!”
“शी हॅज गॉट अ सॉलिड बिग कोकोनटस”
दोन्ही वर्गांच्या शेऱ्यांमध्ये फरक आहे?
कोणत्या मुली मुलांना उत्तेजित करतात?
यापुढील आमचा शोध होता, कोणत्या मुलींना/स्त्रियांना शेरेबाजीत तोंड द्यावे लागते?
असा समज आहे की मुली मुलांना उत्तेजित करतात, किंवा त्यांना आव्हान देतात. थोडक्यात त्या हे सगळं ओढवून घेतात. मुले उत्तेजित होण्याचे एक कारण, “मुलीचे सौंदर्य”
यावर जवळजवळ सर्वच मुलींचे एकमत झाले, “अजिबात नाही”
सुंदर मुलींना कदाचित थोड्या अधिक टिंगलटवाळीला तोंड द्यावे लागत असेल. पण प्रत्येक मुलीला, तरुण मुलीला शेरेबाजीला तोंड द्यावे लागते. सुरवात साधारणपणे १२ - १४ व्या वर्षी होते. ती वयात येऊन, तिच्या शरीराला गोलाई यायला लागली की मुलांची नजर जायला लागते. ‘मुलगी’ असणे इतकेच कारण पुरेसे असते.
आणखी काही कारणे?
पोशाख, चालणे, बोलणे, हसणे.
पाय दाखविणारा लांडा स्कर्ट किंवा वक्षस्थळे दाखविणारा ब्लाउजचा गळा असे पोशाख टीका/शेरे आकर्षित करून घेतात असे मानले जाते.
यावरही मुलीचे म्हणणे पडले, ‘हे अजिबात खरे नाही? जीन्स व टॉपसारखा अंगभर कपडा किंवा साडीसुद्धा शेरेबाजीसाठी पुरेशी होते. मुलांच्या मनात मुलीची जी प्रतिमा असेल ती प्रतिमा सोडून इतर कोणतीही प्रतिमा उभी राहिली तरी शेरेबाजीला मुले प्रवृत्त होतात. जणू मुलीला त्यांचा इशाराच असतो की तु समाजमान्य प्रतिमेखेरीज काही केले तर चुकलेल्या वासराला गुराखी दंडुका वापरून कळपात आणतो, तसी ही मुले त्या मुलीची पारख करतात.
चालणेसुद्धा खास लचकत असण्याची गरज नसते. ताठ मानेने चालणेही तेवढाच अपराध ठरू शकतो. किंबहुना अशा मुलींना जास्तच शेरे मिळतात. जणू पुरुषांसमोर नमत नाही, हाच त्यांचा गुन्हा असतो.
मोकळेपणाने, मोठ्याने बोलणे हेसुद्धा मुलांना शेरे मारण्यासाठी निमित्त होऊ शकते. आणि एखाद्या शेर्याला प्रत्युत्तर देणे म्हणजे तर भलताच अवमान घडतो. डूख धरण्यापर्यंत पाळी जाते.
हसणे, किंवा एकूणच चेहऱ्यावरील आविर्भाव हेही चिथावणीसाठी पुरेसे होतात. या सर्व गोष्टींना ‘ज्यादापणा’ म्हटले जाते. किंवा ‘आगाऊपणा’ म्हटले जाते. हे सर्व संकेत हे मुलांनी ठरवलेले असतात. त्यांच्या आईवडिलांनी नव्हे. किंबहुना बांद्र्याच्या एका उच्चस्तरीय, इंग्लिश माध्यमातील मुलांच्या गटाशी बोलताना त्यांच्यातील काही मुलांची ही ठाम मते आढळली. मुलींना त्यांची जागा दाखविणे हे तरुण मुलांचे नैसर्गिक काम आहे असे त्यांचे मत होते. मुली या अबला आहेत आणि त्यांनी स्वतःची जागा ओळखून वागावे. या जागेच्या आजूबाजूला जाण्याचा प्रयत्न केला ही त्यांच्यावर हल्ला होणारच. शारीरिक किंवा शाब्दिक.
मुलींना काय वाटते?
आमचा दुसरा शोध होता, मुलीवर या छेडछाडीचा परिणाम काय होतो?
अगदी थोड्या मुलींना सामान्य शेरेबाजी ही तारुण्यातील नैसर्गिक घटना वाटते. आपल्या अस्तित्वाची कोणी दखल घेतली तर छान वाटते! आपण कोणाला आकर्षित करू शकतो या कल्पनेने अहंभाव सुखावतो. असे शेरे न मिळणे म्हणजे आपण पुरेसे आकर्षक नाही या कल्पनेने खंतही वाटते. याच मुलींना आमचा उलट प्रश्न होता, हे जर तरुणपणातील नैसर्गिक वागणे असेल तर मग मुली का शेरेबाजी करीत नाहीत? आणि ज्या करतात त्यांना कसे उत्तर मिळते? हा एक खेळाचा, मजेचा भाग असेल तर दोन्ही बाजूंनी तो खेळ सारखाच मोकळेपणे खेळला पाहिजे असे नाही कां वाटत? शिवाय खेळ किंवा विनोद यासाठी एकमेकांची किमान ओळख आवश्यक नाही का?
या निमित्ताने मिश्र ग्रुपमधील मुलांची मानसिकता कशी असते याची चर्चा झाली. अशा मिश्र ग्रुपमध्ये एरवी वातावरण खेळीमेळीचे असते. अनेक विषयांवर समान पायावर उभे राहून गप्पा, चर्चा, मते मांडणी होत असते. परंतु असे लक्षात येते कि, मुलगी ग्रुपमध्ये असेतोवरच हे वातावरण टिकते. ती बाहेर गेल्यावर तिच्याबद्दलही अश्लील बोलायला मागे पाहिले जात नाही.
बहुतांशी मुलींनी छेडछाड हा प्रकार अगदी अपमानकारक असतो असे सांगितले. शेरेबाजीकडे दुर्लक्ष जरी केले तरी तुम्ही सतत धोक्याच्या वातावरणात वावरत आहात याचे ते इशारे असतात. घाणेरड्या स्पर्शामुळे तर फारच हताशपणाची भावना निर्माण होते. आपण काही करू शकत नाही ही भावना रडू आणते. स्वतःचे शरीर घाण, अपवित्र वाटू लागते. शरीराचाच राग यायला लागतो. बाई असल्याचे दु:ख वाटू लागते. त्यामधून शृंगाराची भावना कधीही फुलू शकत नाही. अहंपणा सुखावत नाही.शेरेबाजी करणाऱ्या मुलांविषयी प्रेम वाटत नाही. त्याच मुलांच्या प्रेमात पडलंय अशी उदाहरणे क्वचितच घडतात. हिंदी सिनेमातच हे घडु शकतं. अपरिचित माणसाने तुम्हाला गृहीत धरणं ही कल्पनाच सहन होत नाही. शेरेबाजी, घाणेरडे स्पर्श यामुळे निश्चित संताप येतो. चीड येते. पण दरवेळी ती व्यक्त करता येतेच असे नाही. आणि मग अधिकच शरीर आक्रसून घ्यावेसे वाटते. पुष्कळदा पुढे शिक्षण वगैरे घेण्याची आकांक्षा सोडून द्यावीशी वाटते.
एका मुलीने क्रिकेटचे उदाहरण दिले. महाविद्यालयात तिला क्रिकेट शिकण्याची इच्छा होती. परंतु कोच तिला शिकवितांना नको तिथे हात लावत, त्यांची वासना लक्षात येई. तेव्हा तिने क्रिकेटचा नाद सोडून दिला.
बहुतेक मुलींकडून त्यांच्या स्वतःच्या बाबतीत किंवा मैत्रीणी बाबत घडलेले प्रसंग ऐकायला मिळाले त्यातुन एक निष्कर्ष असा निघतो की प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर मुलगे चिडून उठतात. आणि काहीवेळा परिणती अधिक मोठ्या हल्ल्यामध्ये होते.
मुंबईला गोरेगाव येथील जयप्रकाशनगरमध्ये घडलेली ही घटना आहे.
“माझी मैत्रिण दुपारी अडीच वाजता घरी येत होती. तिने जीन्स व शर्ट घातला होता. मागून एक मुलगा सायकलवरून आला आणि तिच्या पोशाखावरून शेरे मारून पुढे गेला. तिने प्रत्युत्तर केले. त्याबरोबर तो खाली उतरून तिच्याकडे धावला व त्याने तिचा शर्ट फाडला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यावर शेजारच्या दोन तीन बंगल्यातून मुले धावून आली. त्यांनी त्याला पकडला व दोन तीन धबके मारून घालवून दिले. दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्याच्या गँगला घेऊन आला आणि त्या मुलांना माफी मागायला लावली.
पुण्याला दोघी बहिणी रात्री कुत्र्याला घेऊन फिरायला चालल्या होत्या. एक मुलगा सायकलवरून येऊन एकीची ओढणी खेचून जाऊ लागला. तिने ओढणी गच्च धरली. थोड्यावेळाने तो पुन्हा आला. यावेळी पहिल्या बहिणीने कुत्र्याची साखळी सोडवून मारण्यासाठी हातात घेतली. त्याने दुसऱ्या बहिणीची मान पकडली. परंतु तिने सायकलचे कॅरिअर धरून प्रतिकार केला. तेव्हा तो निघून गेला.
अर्थात अनेक मुलींचे म्हणणे पडले कि टिंगलटवाळीचे दोन भाग धरावेत. शेरेबाजीला प्रत्युत्तर देऊ नये. पण अंगचटीला गेलेल्या माणसाला जेथल्या तेथे धरून मारण्याचा प्रयत्न करावा. बहुतेक मुले भेकड असतात. अशा तऱ्हेचे प्रयत्न झाले तर मुलीची शक्ती लक्षात घेऊन पुन्हा अंगचटीला जाणार नाहीत असे त्यांचे मत होते.
यावर किती मुलींनी असे प्रयत्न केलेत असा प्रश्न विचारल्यावर फारच कमी मुलींकडून होकारार्थी उत्तर आले. मात्र भावांना सांगितले.आणि भावांनी दम भरला अशा बऱ्याच घटना ऐकायला मिळाल्या.
घरच्या माणसांचा दृष्टीकोन
तुम्ही स्वतः का प्रतिकार केला नाही या प्रश्नाला दोन उत्तरे असत. एक म्हणजे तो माणूस सूड घेईल ही भीती. दुसरे म्हणजे आईवडिलांनी व भावाने बजावलंय की तुम्ही प्रतिकार केलात तर तुमची बदनामी होईल. वाईट चालीची असा लौकिक होईल.
या निमित्ताने आईवडिलांची प्रतिक्रिया काय असते याची नोंद घेण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच मुली छेडछाड होत असतांना आईवडिलांना सांगत नाहीत. विश्वासात घेत नाहीत. कारण आईवडील बाहेर जाणे बंद करतील ही भीती वाटते. कोणताही धोका पत्करायला आईवडील तयार नसतात. दुसरे म्हणजे आपली मुलगीच वेडेवाकडे वागली असेल. लक्ष वेधले असेल अशीही भीती मनात असल्याने ते मुलीला दोषी धरण्याची शक्यता जास्त असते. बहुतांशी आईवडिलांचा सल्ला मान खाली घालून चालण्याचा असतो. प्रकरण वाढवू नये. तोंडाला तोंड लावू नये. आपण चांगले वागले तर कोणी आपल्या वाट्याला जाणार नाही असेही भाबडे मत असते.
अशा परिस्थितीत मुलींची फारच कोंडी होते. मनातील चीड आणि संताप फक्त मैत्रिणीजवळ व्यक्त करता येतो. पण त्यातुन कृती बाहेर पडतेच असे नाही.
राहता राहिला भाऊ. एखादा मुलगा सातत्याने छेड काढत असल्यास भावाला सांगितले जाते. भावाची भूमिका रक्षकाची असते. तो स्वतः कदाचित दुसऱ्या मुलींची छेड काढत असेल, पण त्याच्या बहिणीला कोणी हात लावता कामा नये. तो त्याला स्वतःचा अपमान वाटत असतो. ‘मुलीची छेड , म्हणजे त्यांच्या माणूस म्हणुन जगण्यावर बंधने येत आहेत - त्याबद्दल चीड नसते, तत्वाचा आग्रह नसतो. तर मला माझ्या बहिणीचे सरंक्षण करता येत नाही असे दाखवून तुम्ही माझ्या पुरुषार्थाचा अवमान करीत आहात, अशी भावना मनात असते. असे सगळे असले तरी भावांचा निश्चित आधार वाटतो. तसेच काही वेळा मानलेले भाऊ केले जातात. मवाली मुलांनाही मुलगी भाऊ मानते. म्हणजे त्यांच्या आधारे इतरांपासून संरक्षण मिळविता येते.
ज्यांनी स्वतः रस्त्यावर प्रतिकाराचा प्रयत्न केला त्यांना दोन्ही प्रकारचे अनुभव आले. काही प्रसंगी, रस्त्यावरील पुरुष धावून आले आणि त्यांनी मध्ये पडून त्या मुलाला दम दिला. मार दिला. पण काही प्रसंगी उलटही झालेले आढळले की इतर माणसे पाहत राहिली. किंवा फिदीफिदी हसत राहिली. तरीही ज्या मुलींनी प्रतिकार केला त्यांनी आग्रहपूर्वक मांडले की प्रतिकार किती, कसा करायचा हे काळवेळ पाहून ठरवावे. पण थोडातरी प्रयत्न जरूर करावा. असे सातत्याने घडु लागले तर निश्चित स्त्रियांबद्दलची प्रतिमा बदलू शकेल. आणि जरब बसेल. जाता जाता सहज छेडण्याचे प्रकार तरी बंद होतील. जे अधिक निर्ढावलेले, आणि थोडेफार गँगमध्ये संघटीत पुरुष आहेत त्यांच्यावर या प्रतिकाराचा फायदा होणार नाही. पण गंमत म्हणून सहज शेरेबाजी करणारे पुरुष कमी होतील.
जे मुलगे छेडछाड करतात त्यांचे आई-वडील त्यांच्याकडे कसे बघतात? मुलींच्या मते मुलगे स्वतःच्या दोन प्रतिमा वेगळ्या राखतात. आईवडीलही मुलांच्याबद्दलच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात. लहानमुलांच्या ‘वात्रटपणा’ असेल अशी भूमिका घेतात. पुण्याच्या एका मुलीने मात्र एक प्रसंग सांगितला की जेव्हा एका मुलाने अशी शेरेबाजी केली तेव्हा त्या मैत्रिणींनी त्याला फैलावर घ्यायला सुरुवात केली. जवळच बैठ्या चाळीमधून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला सर्वांदेखत मारले. आता तो नजर वर करून पाहत नाही. नेहमीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर ही चाळ असल्याने या प्रसंगाचा खूपच फायदा झाला आहे.
पोलिसांची वृत्ती
पोलिसांची काय भूमिका असते? विनयभंगाबद्दल कायदा असूनही त्याखाली फारशा केसेसची नोंद होत नाही असे दिसते. बहुतेक मुलींना पोलिसांकडे जाण्याचा फारसा उपयोग वाटत नाही. कामगार वस्तीतील मुलींनी तर पोलिस स्वतःच मागे लागल्याचे दोन प्रसंग सांगितले. तसेच एखाद्या माणसाबद्दल तक्रार केली तर तो माणूस पोलिसाला एक दारूचा ग्लास प्यायला देतो आणि चूप करतो असे ठाम मत या मुलीचे होते. दुधवाले भैय्ये, भाजी विकणारे भैय्ये हे स्पर्शसुखासाठी फार उतावीळ असतात. आणि त्यांच्याबद्दल पोलिसांकडे तक्रार करूनही फायदा होत नाही असा अनुभव होता. सर्व पुरुषांची या बाबतीत एकी होताना दिसते.
एकूणच पोलिसांचा पाहण्याचा दृष्टीकोण कसा असतो हे या खालील प्रसंगावरून दिसून येते.
पुण्याला खासगी, मुलीच्या हॉस्टेलसमोरच्या दिव्याच्या खांबापाशी शेजारच्या बंगल्यातील माळी उभा राहायचा. हातवारे, अशश्लील हावभाव करीत कपडे काढायचा. मुलींनी तक्रार केल्यावर रेक्टरने पोलीकडे तक्रार नोंदविली. पोलिसांची पहिली प्रतिक्रिया होती, ‘हॉस्टेल वर राहणाऱ्या मुली ज्यादा असतात, त्याच उत्तेजन दिले असेल”
रेक्टरने मुलींची बाजू घेत त्या सज्जन असल्याचा निवाळा दिला. तरी पोलिस सबइन्सस्पेक्टरचे समाधान झाले नाही. मग बंगल्याच्या मालकानेच मळ्याची धुलाई केली व तो प्रकार थांबला.
पोलिसात तक्रार करायला गेल्यावर दुसरा प्रश्न येतो तो ‘पुराव्याचा. आणि अनेक टोळभैरवांनाही याची माहिती असल्याने, जेव्हा केव्हा पोलिसाकडे जाण्याची दमदाटी करण्यात येते तेव्हा ही पोरे सरळ म्हणतात ‘प्रुफ कोठेय?’ विनयभंगाचे प्रुफ दाखविणे कठीणच असते. एकदा एका मुलीने वडिलांना पाठलाग करणारा मुलगा दाखविला. एक दिवस तिच्या बसच्या वेळी त्या स्टोर्पवर येऊन तो मुलगा उभा राहिला. या मुलीचे वडील त्याच्याजवळ गेले आणि जाब विचारू लागले त्याबरोबर त्याने उलट उत्तर द्यायला सुरवात केली. ‘सबूत दाखवा’ हा मुख्य मुद्दा होता.
पुरुषांच्या वागणूकीचे कारण:
पुरुष असे का वागतात? या प्रश्नाचे उत्तर शोधायला मुलांचीच मदत घेतली. एक उच्चवर्गीय महाविद्यालयीन मुलांचा ग्रुप होता आणि दुसरा पुरुष ह्या पुण्यामध्ये नव्याने सुरु झालेला मुलांचा गट होता. स्त्रीमुक्ती चळवळीला मदतकारक व्हायचे असेल तर पुरुषांची स्वतःची मानसिकता कशी घडत जाते याचा शोध घेतला पाहिजे या भूमिकेवरून हा गट सुरु झाला आहे. पहिल्या गटामध्ये दोन्ही प्रकारची मुले होती. एक प्रवाह होता तो अतिशय पारंपारिक मते असलेला. त्यांचा मते मुली घराचा बाहेर पडू लागल्या की हे असे होणारच. मुलांमध्ये नैसर्गिक आक्रमकता आहे. एखादी एकटी मुलगी, अंधारी रस्त्यावरून जाताना आढळली की आमचे शरीर आमच्या ताब्यात राहत नाही. तिचा उपभोग घेणे ही शारीरिक गरज बनून जाते. त्याच गटातील दुसरा प्रवाह उमदारमतवादी होता. मुलींना बरोबरीच्या व सहकारी मानण्याची गरज त्यांना पटलेली होती. आजच्या या आक्रमक वातावरणामुळे मुलांच्या मनावरचे संस्कार जाणे कठीण आहे असे त्यांना वाटत होते. शेवटी मुलांजवळ शारीरिक बळ जास्त आहेच आणि त्याचा फायदा घेण्याची प्रवृत्ती माणसामध्ये असतेच.
‘पुरुष’ मधील पुरुषांनी मात्र स्पष्टपणे अशी भूमिका घेतली कि आक्रमकता हा संस्काराचा भाग आहे. तसेच एकाकी मुलगी बघितली की शारीरिक उपभोग घेण्याची शारीरिक गरज तयार होते हा मुद्दा चुकीचा आहे. त्या स्त्रीच्या संमतीशिवाय तिच्या अंगाला हात लावता कामा नये असे संस्कार जर लहानपणापासूनच झालेले असतील तर शारीरिक प्रक्रिया नियंत्रित करता येतात, मन शरीरावर नियंत्रण ठेवते. शरीर मनाकडे संवेदना पोचविण्याचे काम करते. पण निर्णय मन घेत असते.
स्त्रियांबद्दल अनादर हा इतका लहानपणापासून जोपासला जातो की अगदी हुशार व एरवी सभ्यपणे वागणारी तरुण मुलेसुद्धा स्त्रियांबद्दल अश्लील शेरे मारण्यास कचरत नाहीत. अगदी ओळखीच्या मुलीबाबतही हे घडू शकते. विवाहित पुरुष मित्रांसमवेत स्वतःच्या पत्नीबद्दल अश्लील बोलू शकतात. किंबहुना विवाहित पुरुष एकूणच अविवाहित पुरुषांना खाद्य पुरवतात.
छेडछाड : शृंगार नव्हे, आक्रमण होय!
ही शृंगारीक अनुभवाची नैसर्गिक गरज म्हणावी तर स्त्रियांना हे करण्याची गरज का भासत नाही? त्यांना प्रामुख्याने श्रुंगारिक अनुभवातील कोमलता व जवळीकेची भावना आवडते असे दिसते. याचा अर्थ दुसऱ्या व्यक्तीला न आवडणारी गोष्ट तिच्यावर शाब्दिक दृष्ट्या जेव्हा लादली जाते तेव्हा ती अशश्लील होते, तेव्हा ते तिच्या भावविश्वावरील आक्रमण ठरते. ही मानवी हक्काची पायमल्ली होते. असे सर्वसाधारण मुलींचे मत दिसले.
पुण्यातील ‘पुरुष’ गटाला ‘छेडछाड’ हा प्रकार अतिशय अश्लाघ्य वाटत होता. त्यांनी १९८७ च्या गणपती उत्सवाच्या वेळी नारी समता मंच व इतर काही गटांबरोबर सहकार्य करून छेडछाड प्रकारावर पथनाट्य सादर केले. एक दोन ठिकाणी काही गुंड मुलांनी त्यांच्यावर कणीस फेकणे वेगेरे प्रकार करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. स्त्रियांना हा विषय अधिक भिडत होता. मात्र त्यांच्या नात्यांमध्ये छेडछाडीच्या बरोबर इतरही स्त्रियांचे विषय घेण्यात आले होते. हुंडाबळी, मारहाण वेगेरे. त्यामुळे छेडछाडीच्या विषयावर पुरेसे लक्ष वेधले जाऊ शकले नाही त्यांची त्यांना खंत वाटत होती. त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांचा लक्षात आले की हुंडा बळी वगैरे महत्वाचे प्रश्न असले तरी त्यांचे स्वरूप छेडछाड पेक्षा वेगळे आहे. छेडछाड ही एका अर्थाने अदृश्य राहते. कारण स्त्रियांचा दैनंदिन जीवनाचा तो भाग बनलाय आणि तो त्यांनी स्वीकारला आहे. एक प्रकारची संचारबंदी त्यांच्या वर लादली गेली आहे आणि त्यांना त्याची सवय झाली. मोकळ्या आकाशात उडण्याची आकांश त्यांनी दडपून टाकली आहे. म्हणूनच छेडछाडीचा प्रश्न प्रकाशात आणून त्याच्या बद्दलचा संताप मुलींच्या मनात निर्माण करणे आणि मुलांच्या मनात शरम निर्माण करणे हे आवश्यक आहे. म्हणूनच पुढील वेळी त्यांनी केवळ छेडछाड विषयावर भर देणारे पथनाट्य दाखविण्याचे ठरविले आहे.
यावर उपाय काय?
सर्व मुलींच्या मनात मुख्य प्रश्न होता, या परिस्थितीवर उपाय काय? काहीतरी कृती झाली पाहिजे अशी सर्वांचीच आग्रहाची मागणी होती अनेक उपायांवर चर्चा केली गेली.
१) स्त्रियांनी एकटे दुकटे कुठे बाहेर पडू नये, शक्यतो घरात राहावे. वेळ प्रसंगी शिक्षण मिळाले नाही तरी चालेल. रात्री, निर्जन अशा रस्त्यांवरून जाण्याची गरज पडत असेल तर तसे प्रसंग टाळावे.
२) बुरखा वापरावा।
३) पोलिसांची कुमक वाढवावी.
४) छेडछाडपटूंना अतिशय कडक शिक्षा द्यावी.
या चारही उपायांमध्ये फारसे तथ्य नाही असे चर्चेअंती आढळून आले. स्त्रियांनी एकटे दुकटे बाहेर जाऊ नये असे म्हणणे म्हणजे छेडछाडपटुंचा विजय मान्य करण्यासारखे आहे. स्त्रियांची जागा चार भिंतींच्या आत हे तत्व हजारो वर्ष मानले गेले. आता स्त्रिया बाहे पडू लागल्या. त्यांची समाजातील, कुटुंबातील भूमिका बदलत चालली. त्यांच्या आकांशा वाढल्या. अशा वेळी त्यांनी घाबरून घरी बसावे, एकटे दुकटे बाहेर जाऊ नये म्हणणे म्हणजे इतिहासाचे चक्र मागे फिरवण्यासारखे आहे. अर्थात एखाद्या ठिकाणी काही विशिष्ट मुले सतत्याने त्रास देत असतील तर काही काळ सावधपणे वागा. जपून वागावे लागेल. परंतु हा सरसकट उपाय होऊ शकत नाही. ही रीत पडू शकत नाही.
बुरखा वापरावा म्हणणे तर अधिकच चुकीचे आहे. कारण बुरख्याने स्त्रियांचे अस्तित्व कळतेच. आणि आपण अनेक प्रसंग पाहून अशा निष्कर्षाला आलो आहोत की अनेक पुरुष केवळ पुरुषार्थ दाखवण्यासाठी स्त्रियांना त्रास देतात. सौंदर्य, पोशाख वगैरे घटक महत्वाचे नसतात. अशा परिस्थितीत बुरखे घालूनही फारसा फरक पडणार नाही. शिवाय बुरख्यामुळे स्त्रियांचे जगही संकुचित होऊन जाईल. बुरख्यामुळे स्त्रियांच्या मानसिकतेवरही परिणाम होतो. समानतेच्या या युगात केवळ तुमचे शरीर म्हणून तुम्ही आक्रसलेले जिने जागा. दिवभीमासारखे तोंड लपवा असे सांगितले तर कोण ऐकले!
पोलिसांची कुमक वाढवणे किंवा छेडछाडपटुंना कडक शिक्षा ह्या दोन्ही उपायाच्या मर्यादा मुलींच्या अनुभवातून सतत व्यक्त होत होत्या.पोलिस सुद्धा शेवटी पुरुषच. त्यांचे स्वतः चे संस्कार पूर्वग्रह हे लक्षात घेता त्यांच्या कडून फार मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळेल हे शक्य वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांकडे जाणे, तक्रार नोंदविणे, खटला चालविणे, ‘पुरावा’ हा घटक खूप महत्त्वाचा असतो. बलात्कारासारख्या क्रूर, हिंसक घटनेतही पुरावा शोधणे कठीण जाते. तर छेडछाड हा प्रकार अदृश्य राहण्याची शक्यता अधिक. काही वेळा ते अतिशय छुपेपणाने होता तर काही वेळा एकांत जागी, अंधारात, जेव्हा कोणी साथीदार नसतांना होतात. तेव्हा साक्षी पुरावे शोधणे कठीणच असते. शिवाय मुलीनेच उत्तेजित केली असेल, तिची संमती असेल, तीच बदचालीची असेल. अशा प्रकारचे उदंड आरोप वापरून स्त्रीची बाजू लंगडी करण्याचा प्रयत्न सतत केले जातातच, त्यामुळे पोलिस कोर्ट कचेऱ्या यातून फारसे काही हाती लागणार नाही.
खरे उपाय:
तेव्हा काही उपाय गृहीत धरूनच खरे उपाय शोधावे लगतील आणि याबाबत चर्चेअंती सर्व मुलींचे तरी एकमत झाले. स्त्रिया आता शिक्षण, नोकरी, व्यवसाय, मनोरंजन यासाठी घराबाहेर पडणारच. वेळी अवेळी सुद्धा त्यांना घर बाहेर पडावे लागेल. एकटे दुकटेही बाहेर पडावे लागेल तेव्हा मुळातच त्यांना मनात धाडस बाळगावेच लागेल आणि मुलांनाही हे मान्य करावे लागेल की रस्त्यावर हिंडणे व सार्वजनिक ठिकाणी वावरणे हा जितका पुरुषांचा अधिकार आहे तितकच स्त्रियांना अधिकार आहे. ह्या अधिकाराच्या जाणीवेने एक प्रकारचा आत्माविश्वास स्त्रियांमध्ये येणे जरुरी आहे.
यासाठी मदत अर्थात आई वडील, भाऊ यांची होणार आहे, यांनीही सातत्याने स्त्रियांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. सावधगिरी जरुरू बाळगावी, मदत करावी, परंतु केवळ संरक्षकाची भूमिका घेऊ नये. मुलीलाही काही प्रमाणात प्रतिकार करायला शिकवावे. मदत यंत्रणा, पिछाडी सांभाळणारी फळी म्हणून काम करावे.
त्याचप्रमाणे घरातील मुलग्यांवर अतिशय काटेकोरपणे संस्कार करावे. त्यांना पाठीशी घालता कामा नये, ‘वात्रटपणा’, ‘तारुण्यासुलभता’ अवरणांखाली त्यांच्या चाळ्यांकडे दुर्लक्ष करू नये, आई वडिलांचा पाठिंबा व सामाजिक मान्यता न मिळणे हे महत्वाचे घटक आहे.’आज ‘बहिणीला संरक्षण व परस्त्रीवर आक्रमण’ अशी मुलांची धारणा दिसते. ती जाऊन प्रत्येक स्त्रीचा आदर आणि तिच्या संमतीशिवाय तिच्या अनुभवविश्वाला स्पर्श न करणे हे प्रत्येक मुलाने मान्य केले पाहिजे.
यासाठी मुलामुलींचे संबंध अधिक मोकळे झाले पाहिजे. तारुण्यसुलभ आकर्षण व्यक्त करण्यासाठी एकमेकांना समजून घेण्यासाठी अधिक जागा मिळाली पाहिजे. अर्थात केवळ एवढे होऊन भागात नाही. हे पाश्चात्य देशांच्या अनुभवावरून लक्षात येते. तिथे मुलेमुली बऱ्याच प्रमाणात एकत्र भेटतात, डेटिंग करतात, कुतुहूल शमविण्याचे मार्ग उपलब्ध असतात. परंतु स्त्रियांबद्दलचा आदर मुळातच नसल्याने, मोकळेपणा उपलब्ध होऊनही परक्या मुलीची छेडछाड करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क असल्याच्या अविर्भावात मुलगे वागतात. तेथे आपल्या पेक्षा छेडछाड कमी होत असेल परंतु याउलट बलात्कारांचे प्रसंग अधिक घडतात कारण मुलेमुली एकांतात असल्याचे प्रसंग आधिक असतात. तेव्हा मुलग्यांची जडणघडण हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पुरुषांमधील नैसर्गिक आक्रमकता ही मिथ सर्व जगभर आहे. लॅटीन अमेरिकेतील देशांमध्ये तर ती फारच जास्त आहे. तेथील स्त्रिया छेडछाडीबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रार करत असतात.
स्त्रिया जेव्हा रस्त्यावर हिंडण्याचा आम्हालाही अधिकार आहे हे समुदायिकपणे सांगण्यासाठी जमतात, मिरवणूक काढतात, तेव्हा पुरुषांना तो त्यांचा अपमान वाटतो. त्यांच्या सत्तेला दिलेला शह वाटतो. हॉलंड मध्ये स्त्रिया दरवर्षी १९ मे रोजी ‘टेक बॅक दि नाईट’ (रात्रीही आमच्या आहेत) ही घोषणा देऊन मोर्चा काढतात त्यावेळी त्यांच्यावर टोमॅटो फेकली जातात, अंडी फेकली जातात, अनेक पुरुष पब्ज मधून बाहेर येऊन पॅन्टच्या झिप उघडून लिंग दाखवतात. ‘तुम्ही वेश्या आहात, तुम्हाला भोगले पाहिजे’ अश्या प्रकारचा उदगार काढून राग व्यक्त करतात.
याचा अर्थ असा आहे की स्त्रीला माणूस म्हणून जगण्यासाठी जेवढी ‘जागा’ लागते तेवढी जागा तिला द्यायला पुरुष अजून तयार नाही. कुंपणाच्या आत तिला ढकलण्यासाठी अनेक प्रकारचे साधने पुरुष वापरतो. त्यातीलच एक साधन छेडछाड.
स्त्रियांच्या हक्कांचे पुरुषांना भान आणून देण्यासाठी अर्थातच अनेक पातळ्यांवर प्रयत्न करावे लागतील. संस्कार प्रबोधन याला पर्याय नाही. परंतु त्याच्या जोडीला सामाजिक दडपण कसे वाढविता येईल हे ही पाहायला पाहिजे.
ताबडतोबीने एक उपाय सुचविला जातो तो म्हणजे ‘सेल्फ डिफेन्स. स्वयं सुरक्षा! यासाठी आवश्यक ते शिक्षण मुलींना देण्याची योजना अनेक मुलींना सुचवले की शाळेत व महाविद्यालयात व्यायामाच्या वेळी सेल्फ डिफेन्सचे प्रकार शिकवावे. कल्पना छान वाटली. काहींचे म्हणणे पडले की ‘स्वयं सुरक्षेचे प्रशिक्षण’ वापरण्याचे प्रसंग फार कमी वेळा येतात. कारण छेडछाडीचे विविध प्रकार असे आहे की प्रत्यक्ष अंगावर धावून येणे हा प्रसंग थोड्या वेळा घडतो. परंतु तरीही त्या प्रशिक्षणामुळे आत्मा विश्वास वाढण्यास मदत होते. शिवाय हालचाली जलद घडू शकतात. अबलत्वाची भावना जाते. असे काही चांगले परिणाम घडतात म्हणून हे प्रशिक्षण शालेय व महाविद्यालयीन अभ्यास क्रमाचा भाग करावा असे अनेक जणींना वाटू लागले आहे.
दूसरा उपाय म्हणजे एकेका भागात सातत्याने त्रास देणाऱ्या छेडछाडपटूंबाबत सामुदायिक कृती करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी हवे असल्यास जवळ स्त्रीसंघटनेला गाठावे. त्या भागातील लोकांची सभा घेऊन बहिष्काराचे तंत्र अवलंवावे. आईवडिलांनाही ह्या बहिष्कारामध्ये सामील करून घ्यावे. सामुदायिक कृतीचा फायदा म्हणजे एका व्यक्तीवर डुख धरला जाणार नाही. आणि असा धरला गेल्यास, इतर लोक, संघटना मदतीला धावून येतील अशी अशा बाळगण्यास हरकत नाही. अशा सामुदायिक कृतीमध्ये केला त्या मुलास जरब बसविण्याचा हेतू असता कामा नये तर या प्रवृत्ती विरुद्ध धाक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्याच प्रमाणे पुरुषांच्या एखाद्या गटाने अशा प्रकारचे जरब बसवण्याचे काम करू नये. कारण त्यामध्ये पुन्हा ‘संरक्षक भाऊ’ ही प्रतिमा खोलवर बिंबवली जाईल. जास्तीत जास्त स्त्रियांना, मुली, आई यांना सामील करून घेऊन सामुदायिक कृती झाली तर स्त्रियाही सबल आहेत, त्या प्रतिकाराला सिद्ध आहेत अशी प्रतिमा निर्माण होऊ शकते.
जागोजागी प्रतिकार झाले, काही वैयक्तिक पातळीवर, काही समुदायील पातळीवर, तर हळूहळू स्त्रीविषयक प्रतिमा बदलण्यास मदत होईल. पुण्याच्या ‘पुरुष’ गटाने अशी पथनाट्ये केली तसे पथनाट्य सादर करून प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. मुलीमुलींमधील संवादाला वाव देऊनही मुली विषयी गैरसमज घालवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. अनेक छंद जर बरोबर जोपासले गेले तर मुलेमुली अधिक चांगल्या वातावरणात जवळ येतील. आणि मोकळेपणा वाढेल. आक्रमण करून मुली वश होणार नाहीत, शृंगार भावना फुलणार नाही. तर विश्वास संपादन करून जवळीकेची भावना निर्माण झाली तर खरा शृंगार फुकू शकतो. शरीर संवेदना झेलण्यासाठी दोघांचीही सिद्धता होते. आणि तोच आनंद उच्च कोटीचा असतो हे समजावून सांगण्याची आज अतिशय गरज आहे.
आणि त्यासाठी निकोप वातावरण तयार करणे हे प्रौढांचे काम आहे. आई वडील, शिक्षक, समाजसेवक, तरुण मंडळे, पोलिस या सर्वानीच यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.