आम्ही काही मैत्रिणी १९७५ नंतर स्त्री-चळवळीत अधिकाधिक सक्रिय होत गेलो. अनेक नवे उपक्रम हाती घेतले, अभ्यासवर्ग चालवले, खूप चर्चा केल्या, शिबिरे भरवली. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आमच्यापैकी काहीजणींनी मिळून “मैत्रिणी” या नावाने स्त्रियांसाठी खुले व्यासपीठ चालवायला सुरुवात केली. १९८३ पासून हा उपक्रम आम्ही ७-८ वर्षे सातत्याने चालवला. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दादर या मध्यवस्तीत एका शाळेमध्ये ३.३० ते ५.३० या वेळात स्त्रियांच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित, जिव्हाळ्याचे असे विषय या व्यासपीठाद्वारे चर्चेला घेतले जात असत. गोलाकार बसून अनौपचारिकपणे चर्चा-गप्पा चालत. कार्यक्रमाच्या विषयाची सूचना वर्तमानपत्रातून दिली जात असे. चर्चेमधूनच पुढील महिन्याचा विषय ठरवला जात असे. या चर्चांना सातत्याने हजेरी लावणाऱ्या मैत्रिणी साहजिकच एकमेकींच्या अधिक जवळ आल्या. खुल्या व्यासपीठाच्या जोडीने आणखी काही करावे, असे त्यांना वाटू लागले. एखाद्या विषयावरील चर्चा चांगली रंगली, त्यातून महत्त्वाचे मुद्दे पुढे आले, तर त्याचा सविस्तर अहवाल-वृत्तांत लेखाच्या स्वरूपात वर्तमानपत्रात देण्यास आम्ही सुरूवात केली होती, त्यामुळे या व्यासपीठाच्या जोडीने लेखनप्रकल्प सुरू करावा, असे या मैत्रिणींना वाटू लागले. यातूनच ‘स्त्री उवाच’ या गटाची निर्मिती झाली. जाणीव जागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ‘स्त्रियांना बोलते करणे’ हा उपक्रम त्या काळात सर्वदूर भरात आलेला होता, म्हणून आम्हाला ‘स्त्री उवाच’ हे नाव अत्यंत समर्पक वाटले. १९८५ मध्ये मैत्रिणी व स्त्री-मुक्ती संघटना यांच्या प्रमुख पुढाकाराने स्त्री-मुक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ९ ते २१ जानेवारी १९८५ या १३ दिवसात सातारा, सांगली, इचलकरंजी, मिरज, कोल्हापूर, गारगोटी, गडहिंग्लज, बेळगाव, निपाणी, सोलापूर, बारामती अशा ११ गावी ही यात्रा गेली. या यात्रेसाठी स्लाईड शो, पोस्टर प्रदर्शने, परिसंवाद, कलापथक व पुस्तक प्रदर्शने अशा सर्व माध्यमांचा उपयोग आम्ही गावोगावी करत होतो व त्याद्वारे स्त्री-मुक्तीची संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न होता. यात्रेच्या तयारीचा एक भाग म्हणून काही पुस्तके प्रकाशित करण्याचे आम्ही ठरवले. या पुस्तकांची विक्री गावोगावी केली गेली. ‘स्त्री उवाच’ व ग्रंथाली यांनी एकत्रितपणे ‘स्वतःला शोधताना’ हे पुस्तक प्रकाशित केले. सामूहिक लेखनाचा स्त्री उवाच गटाचा हा पहिला यशस्वी प्रयत्न होता. हे पुस्तक नुसतेच वाचनीय न ठरता सामाजिक विज्ञानाच्या अभ्यासास उपयुक्त ठरले.
या पुस्तकानंतर ‘स्त्री उवाच’ने ‘कायदा? स्त्रियांसाठी नुसताच वायदा!’ हे माहितीपूर्ण पुस्तक, आ. ह. साळुंके यांचे ‘हिंदू संस्कृती व स्त्री’ हे पुस्तक अशी अनेक पुस्तके प्रकाशित केली; परंतु सामूहिक पद्धतीने लिहिल्या गेलेल्या ‘स्वतःला शोधतांना’ या पुस्तकामुळे ‘स्त्री उवाच’ वार्षिकाची बीजे रुजली. आम्ही मैत्रिणींनी या पुस्तकासाठी विविध प्रकारच्या, विविध स्तरावरील व विविध कालखंडातील घटस्फोटांच्या घटनांचा सखोल अभ्यास केला. घटनेतील संबंधितांपैकी शक्यतो सर्वांच्या मुलाखती घेतल्या व ‘केस स्टडी’च्या स्वरूपात या पुस्तकात या घटना लिहिल्या.
या सर्व घटनांवर खूप चर्चा करून या पुस्तकाची प्रस्तावनाही आम्ही सर्वजणींनी मिळून लिहिली, त्यामुळे हे पुस्तक तर महत्त्वाचे ठरलेच; पण या पुस्तकाने आम्हाला घडवले. या सर्व प्रक्रियेत दोन-अडीच वर्षे गेली व १९८७ च्या ८ मार्चला ‘स्त्री उवाच’ वार्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. कामकाज पद्धती
स्त्री चळवळीतील संघटनांचे त्या काळात नाविन्यपूर्ण ठरलेले वैशिष्ट्य म्हणजे संघटनेची अनौपचारिक रचना. ‘स्त्री उवाच’ गट हा देखील अशाच प्रकारचा, संरचना नसतेला गट होता. या मोकळे-ढाकळेपणाचा प्रमुख फायदा म्हणजे चर्चा, इतर कार्यक्रम, प्रत्यक्ष कामकाज यामध्ये कोणी सहभागी व्हावे किंवा होऊ नये यावर कोणतेही बंधन नव्हते. या प्रकारच्या रचनेचे फायदे व तोटे दोन्ही या गटास भोगावे लागले; परंतु त्या काळात चळवळीतील सर्वच कार्यकर्ते या पद्धतीवर भाळलेले होते, म्हणूनच ‘स्त्री उवाच’ गटामध्येही आम्ही कधी पदे निर्माण केली नाहीत, निवडणुका घेतल्या नाहीत, सभासदत्वाचे नियम आखले नाहीत. ज्या निर्णयांवर गटाचे एकमत होईल ते निर्णय राबवायचे, एकमत झाले नाही, तर केवळ बहुमताच्या जोरावर निर्णय अमलात आणायचा नाही, उलट गटातील अगदी थोड्या मैत्रिणींचा विरोध असेल, तरी त्या विरोधास मान देऊन तो मुद्दा दूर ठेवायचा, हे तत्व गटामध्ये राबवले गेले. प्रत्येक वार्षिकाच्यावेळी मुखपृष्ठापासून, तर संपादकीय व इतर मजकुरापर्यंत प्रत्येक वेळी सामूहिक निर्णय घेऊनच काम पुढे नेले गेले. यासाठी वेळोवेळी सभा घेतल्या गेल्या. भरपूर चर्चा वादविवाद झाले.दरवर्षी संपादनाची जबाबदारी एका मैत्रिणीवर सोपवली जाई. या संपादकाचे प्रमुख काम सुसूत्रता राखणे व प्रत्यक्ष अंकनिर्मितीची जबाबदारी सांभाळणे हे असे. संपूर्ण गट संपादकास सर्व साह्य करत असे. संपादकाचे नाव दर वेळच्या वार्षिकावर छापले जाई. पुढील वर्षी संपादक कोण होणार हे आदल्या अंकाच्या वेळीच ठरत असे. नव्या वर्षाची नवी संपादक अंकाच्या आखणीच्या दृष्टीने लेखक-मैत्रिणींना पत्रे वगैरे पाठवण्याची कामे लगेचच करू लागे. पुढील अंकाची मांडणी काय असेल, कोणते विषय घ्यायचे याबद्दलची तिची संकल्पना गटापुढे मांडून, गटाची मान्यता घेऊन मग हे काम पुढे सरकत असे. यात विनाकारण वेळ गेला असे मात्र कधीच झाले नाही. उलट या चर्चा-प्रक्रियेतून अनेक नवीन मुद्दे पुढे येत, सूचना मिळत, त्या अमलात आणण्यासाठी मदतही मिळे; मात्र प्रत्येक वार्षिकाचा बारकाईने अभ्यास केला व संपादन करणारी व्यक्ती व्यक्ती, कार्यकर्ती व लेखिका म्हणून तुम्हाला माहिती असेल तर त्या संपादकाची छाप अंकावर पडल्याचे निश्चित जाणवते. याचाच अर्थ ‘स्त्री उवाच’ गटाने प्रमुख संपादकांवर अंकुश असा ठेवला नाही, सहयोग मात्र दिला. ८ मार्च १९८७ रोजी प्रकाशित झालेल्या पहिल्या अंकाचे संपादन विद्या बाळ यांचे होते. ‘स्त्री’ मासिकाच्या जबाबदारीतून त्यावेळी त्या नुकत्याच मुक्त झाल्या होत्या व ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाची सुरूवात तोपर्यंत झाली नव्हती. आमच्यातील सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ती व अनुभवी लेखिका म्हणून विद्याताईंकडे पहिल्या अंकाची जबाबदारी दिली गेली. पुढे १९८९च्या ऑगस्टपासून विद्या बाळ यांचे ‘मिळून साऱ्याजणी’ हे मासिक सुरू झाले. त्यांनी १९९१ च्या ‘स्त्री उवाच’ वार्षिकात ‘स्त्री ते मिळून साऱ्याजणी’ शीर्षकाचा लेख लिहून या प्रवासाचा आलेख रेखाटला आहे.
येथे नमूद करण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विद्या बाळ यांच्या सहीचे संपादकीय ‘स्त्री उवाच’ च्या १९८७ च्या पहिल्या वार्षिकात आहे; परंतु त्या जोडीला लगेचच ‘स्त्री उवाच’ गटातर्फे ४ ओळींमध्ये वार्षिकाबाबतची गटाची भूमिका मांडली गेली आहे. ती भूमिका अशी: ‘आजघडीला स्त्री-मुक्ती दशक उलटूनही वर्ष लोटले आहे. स्त्रियांच्या आशा-आकांक्षांना नवीन धुमारे फुटत असतानाच, वातावरणातील कोंडी वाढत चालली आहे. लैंगिक अत्याचारांचे वाढते प्रमाण, गर्भजलपरीक्षेचा वाढता दुरुपयोग, लोकसंख्या नियंत्रणाच्या नावे स्त्रियांसाठी अपायकारक इंजेक्शन्सचा पुरस्कार, रोजगाराच्या कमी होणाऱ्या संधी, कायद्यांमधल्या त्रुटी आणि पळवाटा, या सर्व प्रकारांनी होणारी कोंडी फोडण्यासाठी केलेले प्रयत्न - या साऱ्यांकडे डोळसपणे पाहण्यासाठी केलेली ही एक धडपड’ म्हणजे - ‘स्त्री उवाच’ गट.
‘स्त्री उवाच’ गटाचे पहिले वार्षिक प्रसिद्ध होऊन पंधरा वर्षे उलटली; पण आजही या चार ओळी वाचल्यावर खेदाने असे म्हणावेसे वाटते की, वातावरणातली कोंडी तशीच आहे. भगवी आणि हिरवी धर्मांधता दिवसेंदिवस वाढते आहे. धडपड मात्र अपुरी पडते आहे, थंडावली आहे!
गटाने पहिल्या वार्षिकात जी भूमिका मांडली त्याचे प्रतिबिंब सर्व अंकातील लेखात पडल्याचे दिसते. ‘स्त्री उवाच’ गटाने गटातील प्रत्येक कार्यकर्तीला लिहिते केले. अंतिम स्वरूप देण्यापूर्वी प्रत्येक लेखिकेने गटाबरोबर भरपूर चर्चा केल्या. या चर्चांमुळे कार्यकर्तीला लिहिण्यास प्रोत्साहन मिळालेच, शिवाय लेखही उच्च दर्जाचे झाले.
संपादक कोणीही असले, तरी प्रत्येक अंकातला प्रत्येक लेख छापला जाण्यापूर्वी गटामधील ४-५ मैत्रिणी वाचत, त्यावर मते मांडत, चर्चा घडवून आणत. प्रत्येक लेखाची सुरूवातीची ठळक छापातली (इंट्रो) ओळख गटामध्ये चर्चा करून गटातर्फे लिहिलेली आहे. प्रत्येक अंकाच्या प्रत्येक लेखात ‘स्त्री उवाच’ गट सामूहिकरीत्या इनव्हाल्व होता, आस्थेने सहभागी होत होता, संपूर्णपणे गुंतलेला होता हे यावरून स्पष्ट होते. चळवळीच्या दृष्टीने अशा प्रकारची कार्यपद्धती व त्यामागील प्रक्रिया फार महत्वाची आहे.
अंकाचे स्वरूप
‘स्त्री उवाच’ चा पहिला अंक ८ मार्च १९८७ रोजी प्रकाशित झाला व ८ मार्च १९९४ रोजी शेवटचा- म्हणजे आठवा अंक प्रकाशित झाला. आठही वर्षे अंकाच्या स्वरूपात सातत्य राहिल्याचे दिसते. सर्व अंकांची पृष्ठसंख्या १७० ते १८० च्या आसपास आहे. पहिल्या अंकाची किंमत २० रुपये होती, ती शेवटच्या अंकाच्या वेळी ३५ रुपये झाली आहे. अंक कोणत्याही दिवाळीअंकासारखा दिसतो. त्या मानाने किंमत वाजवी आहे. अंकाच्या सुरूवातीला प्रमुख संपादक व ‘स्त्री उवाच’ म्हणजे आम्ही, असे म्हणून गटातल्या सर्व मैत्रिणींची नावे येतात. प्रत्येक अंकाचे मुखपृष्ठ वैशिष्ट्यपूर्ण, स्त्रियांशी संबंधित व स्त्री कलावंताने रेखाटलेले आहे. मुखपृष्ठाबद्दल गटाला काय म्हणायचे आहे ते अनुक्रमणिकेच्या पानावर लिहिलेले आहे. हे लिखाणदेखील महत्त्वपूर्ण व मननीय आहे. प्रत्येक अंकामध्ये एका इंग्रजी स्त्रीवादी कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद दिलेला आहे. इंग्रजी भाषेतील स्त्रीवादी कादंबऱ्या मराठी वाचकांपर्यंत पोचवण्याचे एक महत्त्वाचे काम ‘स्त्री उवाच’ने केले आहे. सर्व अनुवाद चांगल्या दर्जाचे, ओघवते आहेत. या आठही संक्षिप्त अनुवादांचे एकत्रित पुस्तक काढले गेले, तर ते नक्कीच वाचनीय ठरेल. प्रत्येक अंकात त्या त्या वर्षी घडलेल्या घटना, उभे राहिलेले प्रश्न याच्याशी संबंधित लेख आहेत. सर्वच लेख वाचनीय व अभ्यासनीय आहेत. या अंकांच्या निमित्ताने काही मैत्रिणींनी शोधाभ्यास केले. ‘मराठी रंगभूमीच्या इतिहासातून स्त्रियांचा शोध’ हा नीरा आडारकर यांच्या लेखाचा उल्लेख अशा शोधाभ्यासाचे उदाहरण म्हणून करता येईल. संदर्भासाठी असे लेख कोणाही अभ्यासकाला उपयोगी पडू शकतात. या अंकाच्या निमित्ताने काही डॉक्युमेंटेशनही झाल्याचे दिसते. ‘जागरूकता निर्मिती प्रकल्प’ हा उपक्रम आमच्या काही मैत्रिणींनी चालवला होता. त्याचा विस्तृत अहवाल विद्या विद्वांस यांनी १९९१ च्या अंकात दिला आहे. अशा प्रकारचा उपक्रम चालवू इच्छिणार्यांसाठी हा अहवाल मार्गदर्शक ठरू शकतो. अशा प्रकारचे इतरही अहवाल, वैयक्तिक अनुभवांचे प्रवास हे देखील मोलाचे लेख या अंकातून सापडतात.
प्रकाशन समारंभ
‘स्त्री उवाच’ वार्षिकाचा ८ मार्चला होणारा प्रकाशन समारंभ म्हणजे त्या काळी मुंबईतील स्त्रीवादी चळवळीतला एक मोठा व महत्त्वाचा इव्हेंट ठरत असे. ८ मार्चचे इतर कार्यक्रम ठरवताना ‘स्त्री उवाच’चा काय कार्यक्रम आहे हे बघून मग इतर संघटना आपापले व एकत्रित कार्यक्रम ठरवत. सर्व संघटनांचा एकत्रित कार्यक्रम नेहमी ८ मार्चच्या संध्याकाळी असतो, त्यामुळे ‘स्त्री उवाच’चा कार्यक्रम सकाळी करण्याची प्रथा पडली व सकाळची वेळ असल्याने ८ मार्चच्या जवळचा आधीच्या किंवा नंतरच्या तारखेचा रविवार घ्यायचा असेही ठरून गेले होते. प्रभात संस्थेच्या सहकार्याने काही वर्षे आम्ही स्त्रीवादी चित्रपट दाखवून ८ मार्च साजरा केला. कार्यक्रमाचा एकच प्रकार सातत्याने ठेवला नाही, तर दरवर्षी कार्यक्रमाचे स्वरूप बदलते ठेवले. चित्रपटांच्या कार्यक्रमांपैकी लक्षात राहण्यासारखे चित्रपट म्हणजे राखीचा परमा हा चित्रपट, शबानाचा सती हा चित्रपट,तर दीप्ती नवलचा पंचवटी हा चित्रपट. हे सर्व चित्रपट स्त्रीकेंद्री होते. ८ मार्चच्या निमित्ताने ते अनेक प्रेक्षकांनी, सर्व कार्यकर्त्यांनी पाहिले, त्यावर चर्चा झाल्या. रिंकी भट्टाचार्य व बासू भट्टाचार्य यांच्यामध्ये कौटुंबिक कलहाची केस चालू असताना बासूंचा चित्रपट ‘स्त्री उवाच’ने दाखवला याबद्दल रिंकीच्या मैत्रिणी व काही संघटना यांनी नाराजी दाखवली, जाहीर निषेध केला, त्यावेळी ‘व्यक्ती व त्याची कलाकृती यांना वेगवेगळे मापदंड लावावेत का लावू नये?’ यावर बराच ऊहापोह या निमित्ताने झाला. एका वर्षी सुमित्रा भावे यांचे लघुपट दाखवून व त्यावर चर्चा करून ‘स्त्री उवाच’ने ८ मार्च साजरा केला. वार्षिकाच्या प्रकाशनासाठी स्त्रीवादी व्यक्ती प्रमुख पाहुणी म्हणून बोलावली जाई. दीना पाठक, अनिता कंवर या अभिनेत्रींना या निमित्ताने आम्ही बोलावले व बोलते केले. शांता हुबळीकर या जुन्या जमान्यातील ज्येष्ठ अभिनेत्री पुण्याहून वार्षिकाच्या प्रकाशनासाठी एका वर्षी आल्या होत्या. ‘व्हय मी सावित्री’ या एकपात्री नाटकाचा प्रयोग एका प्रकाशन समारंभाच्या वेळी झाला. ‘चारचौघी’ नाटक खूप गाजत होते. त्या वेळी या नाटकातील सर्व कलावंतांना एका व्यासपीठावर बोलावून, त्यांना त्यांच्या भूमिकेत शिरायला लावून ‘मग तुम्ही असे का वागलात?’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून एक रंगतदार कार्यक्रम आम्ही केला, तो खूप गाजला व ‘चारचौघी’ नाटकावर भरपूर चर्चा झाली. सतत चांगले कार्यक्रम आखणे, त्यासाठी चर्चा, विचारविनिमय करणे हा ‘स्त्री उवाच’ गटाचा एक उपक्रमच झाला. इतर वेळीसुद्धा मैत्रिणी व ‘स्त्री उवाच’ मिळून काही कार्यक्रम आम्ही घेतच होतो.यातील काही कार्यक्रमांचा अहवाल नंतर लेखाच्या स्वरूपात वार्षिकामध्ये प्रकाशितही झाला.स्त्रीवादी पुरुष कार्यकर्त्यांची मनोगते, स्त्रीवादी समीक्षा असे अनेक विषय या कार्यक्रमांसाठी घेतले गेले. १९८७ ते १९९४ या कालखंडात स्त्री-चळवळ अशा टप्प्यावर होती की, अशा चर्चा- असे कार्यक्रम सतत करणे हे फार गरजेचे होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक व्यक्तींपर्यंत आमचे विचार आम्ही पोचवू शकलो.‘स्त्री उवाच’ वार्षिकाचे अर्थकारण
‘स्त्री उवाच’ गट बांधला गेला व प्रकाशन उपक्रम हाती घेण्याचे ठरले त्या वेळी गटातील प्रत्येक कार्यकर्तीने आपापल्या कुवतीनुसार एक हजार किंवा पाचशे रुपये गटासाठी दिले. १९८४ च्या सुमारास ही रक्कम फारशी कमी वाटली नाही. या रकमेतून सुरूवातीची दोन-तीन पुस्तके निघाली. १९८७ ला ‘स्त्री उवाच’ वार्षिक काढायचे ठरले तेंव्हा जाहिरातींद्वारे पैसा उभा करण्याचे ठरले. सुरूवातीच्या सर्व वार्षिकांसाठी भरपूर जाहिराती मिळाल्या; कारण जाहिराती मिळवणाऱ्यांचा उत्साह दांडगा होता व चळवळीमध्ये वातावरण पोषक असल्याने विविध कंपन्या जाहिराती सहजतेने देत होत्या. हळूहळू हा उत्साह ओसरला. जाहिराती सहजतेने मिळणेही दुरापास्त झाले. पहिल्या वार्षिकाच्या जाहिरातींचे उत्पन्न जवळजवळ पन्नास हजार झाले होते. पहिल्या वार्षिकाच्या ११०० प्रती काढल्या गेल्या. प्रत्येक प्रतीचा खर्च जास्त होता, तरी किंमत २० रुपयेच ठेवली; परंतु सर्व प्रती तर खपल्या नाहीतच; पण जे अंक विकले गेले त्यांची विक्री किंमत पूर्णपणे वसूलही झाली नाही, त्यामुळे जमवलेल्या पैशांमध्ये चांगलाच खड्डा पडला. पुढच्या प्रत्येक वार्षिकाच्यावेळी पैशाची गळती अशाच प्रकारे चालू राहिली. शिवाय दरवर्षी झोकदार प्रकाशन समारंभ आम्ही करायचो, त्यावरही खर्च केला जाई. जाहिरातींचे उत्पन्न कमी-कमी होत गेले. प्रतींची संख्या आम्ही कमी करत गेलो; पण विक्रीतून पैशाची वसुली योग्य प्रकारे होत नव्हती. प्रतींचा हिशेब काटेकोरपणे कोणी ठेवत नव्हते. गट ‘स्ट्रक्चरलेस’ असल्याचा तोटा येथे जाणवला.पैशाचे व्यवहार आमच्यापैकीच कोणी ना कोणी पाहत होते. दोघींच्या सहीचे ‘स्त्री उवाच‘ हे बँकेचे खातेही उघडले होते. लेखक-संपादक कोणतेही मानधन न घेता कामे करत होते; पण तरीही वार्षिक हळूहळू तोट्यात जात आहे, पैसे कोणीही खात नाही, तरी पैसा आटतो आहे, याबद्दल जबाबदारीने कोणीही लक्ष घातले नाही. भातुकलीचा चट्टामट्टा झाल्यावर मुलींनी खेळ आवरता घ्यावा, तसे ८ अंक झाल्यावर पैसे संपले म्हणून ९वा अंक काढला नाही. इतके सहजपणे ते घडले व तसेच ते स्वीकारले गेले. त्याची कोणाला खंत वाटली नाही. निदान १० अंक, तरी काढूयात असे कोणी म्हटले नाही, असे येथे खेदाने नमूद करावेसे वाटते.