स्त्रीवादी समीक्षा असते का? चर्चासत्राचे संकलन

 

साहित्याचा अभ्यास करताना त्या त्या काळातील ललित आणि ललितेतर साहित्य लक्ष्यात घ्यायला हवे. स्त्रीमुक्तीवादी साहित्य समीक्षेसाठी लागणारी सामग्री ललितेतर साहित्यातून मिळू शकेल. ताराबाई शिंदेंचा स्त्री पुरुष निबंध वाचला असेल तर त्या काळातील अन्य स्त्रियांनी लिहलेल्या कथा व कादंबऱ्या अभ्यासण्याची नवी परिमाणे सापडू शकतील. तसेच ललित साहित्याची स्वायत्तता म्हणजे काय? याही प्रश्नाचा अधिक नेमकेपणाने विचार केला पाहिजे. एखादी कथा एखाद्या लेखकाची असो, त्याला फार मर्यादित अर्थ असतो. एखाद्या काळात विशिष्ट टप्यावर ती व्यक्ती अपरिहार्यपणे तसेच लिहिते असे दिसते. त्यामुळे कलाकृतीची व्यक्तिनिष्ठ समीक्षा फार मर्यादित होण्याची शक्यता असते हे लक्षात घ्यायला हवे.

तरीही ललित साहित्य हा एका विशिष्ट व्यक्तिमत्वाचा अविष्कार असतो हे नाकारता येत नाही. व्यक्तित्व आणि त्या व्यक्तित्वाचा अनुभव याच्या देवाणघेवाणीतून स्वतंत्र कलाकृती जन्म घेते. यामध्ये साहित्याच्या “स्वायत्ततेला मर्यादित अर्थाने मान्यता दिलेली आहे”.

रंजकतेला अति महत्व

इथे आणखी एक जाणवते, ते असे कि १९२० च्या सुमाराला फडके-खांडेकरांचा उदो उदो झाला. तेव्हा गीता साने, इंदिराबाई सहस्त्रबुद्धे, प्रेमा कंटक, विभावरी शिरुरकर ह्या स्त्री लेखिका फार चांगले आणि महत्वाचे लिहित होत्या. पण त्यांचे लेखन मागे का पडले, त्यांच्या लेखनातील नाही त्या मुद्यांवर भर देऊन टिंगल का झाली याचा गंभीरपणे विचार झाला पाहिजे. खरे तर स्त्रीमुक्तीवादी समीक्षा म्हणजे नवे समाजशास्त्र घडविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ज्या ज्या कलाकृती आजवर अभिजात आणि उच्च म्हणून गौरविल्या गेल्या त्या त्या कलाकृती नव्याने तपासून त्यातील दडलेली, गृहीत धरलेली मूल्य व्यवस्था मांडण्याचे हे काम आहे. प्रश्तापित मूल्य व्यवस्थेच्या विरोधात उभी राहणारी ही विचार सरणी असल्याने प्रश्तापित सौंदर्याचे, कलात्मकतेचे निकष मान्य होणे कठीणच होईल. स्त्रीमुक्तिवादी समीक्षेचे सौंदर्यशास्त्रही भिन्न असेल.

साहित्य केवळ साध्य नव्हे, साधनही नव्हे

साहित्य समीक्षेच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहे. समाजशास्त्रनिष्ठ पद्धती मध्ये स्त्रीमुक्तीवादी समीक्षेचा विचार करावा लागेल. ह्या समीक्षेतून नवी संवेदनशीलता अभिव्यक्त होते. ज्या प्रमाणे दलित साहित्याच्या व्याख्या बदलल्या आणि केवळ दलितांनी लिहलेले तेच दलित साहित्य हा अट्टाहास संपला. त्याच प्रमाणे स्त्रीमुक्तिवादी साहित्याचेही होईल. आपोआपच साहित्यही बदलते. साहित्याला केवळ सध्या मानले तर हस्तिदंती मनोऱ्यातील लेखन होते. साधन मानले तर प्रचारकी साहित्य निर्माण होते. मधली भूमिका उपयुक्त वाटते. साहित्य ही एका व्यक्तीने केलेली निर्मिती असेल तरी ती व्यक्ती संस्कृतीतूनच जन्माला येते. म्हणून देशकालपरिस्थितीच्या संदर्भात वेगवेगळ्या टप्यांवर सांस्कृतिक विश्लेषण करणे महत्वाचे ठरेल.

उदाहणार्थ, मध्य युगातील भक्ती चळवळ घेऊ. या चळवळीची संवेदनशीलता धार्मिक, नैतिक होती. त्या काळात संत कवयित्रीचे लेखन आहे. ही एक घडामोडच होती पण ती नव्याने अभ्यासताना धार्मिक, नैतिक संवेदनशिलतेचा संदर्भ डावलून चालणार नाही. हे डावलले तर सुमार साहित्याला श्रेष्ठ दर्जा दिला जाईल.

आपण एखाद्या विचारसरणीचे भ्रष्ट अनुकरण करणारे साहित्य दुय्यम दर्जाचेच मानतो. त्यातील स्वातंत्र्याचा उद्गार कृतकच असतो. पण आपण स्त्रिया म्हणून, दलित म्हणून शोषित आहोत याची खोलवर जाणीव ज्या कलावंताला होते, मानवी जीवनाची शोकांतिका ज्याला दसते तो दुय्यम दर्जाचे साहित्य लिहणारच नाही असे मात्र वाटते. एखाद्या विचाराशी तत्वाशी बांधिलकी असणे हे साहित्य निर्मित्याला घातकच ठरते, असे नाही.

फडके खांडेकरांच्या साहित्याचा आता जो उल्लेख झाला त्या बद्दल असे म्हणता येईल कि त्या लेखनात रंजकता भरपूर होती. कलात्मकता नव्हतीच. गीता साने यांच्या कादंबऱ्या आज वाचल्या तर त्यातील विचार व त्यांचे विषय आज महत्वाचे वाटतील, पण त्यात रंजकता नव्हती. त्यामुळे ते टिकले नाही. निबंध लेखनाचे नमुने असे गीता साने यांचे लेखन वाटते. त्यांचे अनुभव अस्सल असतील पण ते अभिव्यक्त करण्याची रीत कलात्मक नाही असेच आपल्याला म्हणावे लागेल.

पुरुषी वर्चस्वाच्या व्यवहाराचे अंतरंग उघडे पडणे

आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल कि कोणतीही समीक्षा मुल्यातीत नसते. तटस्थ नसते. ती कळत नकळत पक्षपाती असते. स्त्रीमुक्तीवादी सामीक्षेचाही एक हेतू आहे, तो म्हणजे साहित्यातील पुरुषी वर्चस्वाच्या व्यवहाराचे अंतरंग उघडे पाडणे. म्हणून जो पर्यंत स्त्री मुक्तीवादी चळवळी सकस पणे उभ्या राहत नाही तोपर्यंत स्त्रीमुक्तीवादी समीक्षाही दुबळी आणि पोचट राहील. मार्क्सवादी, दलित, ब्लॅक, स्त्रीमुक्तीवादी सगळेजण क्रांतीवादी समीक्षेचा विचार मांडत आहेत. त्यांना मानवतावादी, वास्तववादी साहित्य म्हणजे पुरुषशाही विचारप्रणालीचा भाग वाटतो.मानवतावादाच्या बुडाशी व्यक्तीविषयीची स्वत्वाविषयीची एक कल्पना असते. त्यानुसार कोणताही व्यक्तीगत व सामुहिक स्व हा अगदी चिरेबंदी, एकात्म, एकवट स्व असतो. पण असे ठाशीव, एकवट व्यक्तिमत्व हे माणसाचे स्वप्न असते. अश्या एकवट व्यक्ती, एकवट सौंदर्यकृती निर्माण करतात हा फार मोठा भ्रम आहे. आपल्याकडे सर्वांनाच “लेखक” या व्यक्तीमत्वाबद्दल असे भ्रम असतात. त्यामुळे लेखकाच्या व्यक्तित्व भोवती बुडाचे वलय निर्माण होते. स्त्री मुक्तीवादाच्या मते वीर्यवाण, लिंगरूप, मानवतावादी, सर्जक लेखक हा परमेश्वर रूप धारण करतो आणि त्याची साहित्यिक कृती म्हणजे त्याच्या स्व चे उदासीन प्रतिबिंब म्हणजे “बायकी अस्तित्व” असे होते. यातूनच भाषा सुद्धा एकच प्रकारचे अर्थ मांडणारी असते असा आग्रह धरला जातो. खरा प्रश्न आहे तो कोणत्याही एका व्यक्तीला एकवट समयक अनुभव मिळूच शकत नाही म्हणून अभिजाततेच्या पातळीवर कालाकृतीतही पोकळ्या, विलगता आढळतात, फटी दिसतात. व्यक्ती म्हणून वावरतांना भोवतीच्या जगाने घडवलेल्या त्याचा स्वला कोणती रसायने कधी घडवितात हे तो सांगू शकत नाही म्हणूनच साहित्य समीक्षेची गरज असते.

अभिजातता: एकवटलेपणाचा अनुभव

आपण कालिदास, भवभूती, बहिणाबाई, तुकाराम ह्यांच्या साहित्याची समीक्षा करू शकतो. कारण मालक-मालकी संबंध बाजूला ठेऊन आपण विचार करतो. आपण आजच्या जीवनविषयक अनुभवातून ज्या त्रुटी आपल्याला त्यांच्या लेखनातून दिसतात त्याचा त्यांच्या अभिव्यक्तीवर काय परिणाम झाला हे आपण सांगतो. एखादी कलाकृती फॅसिस्ट विचारसरणीची असली तरी तीची अभिजातता कोणी नाकारत नाही. पण त्या कलाकृतीने कोणता भाग मौनात दडविला आहे कोणता प्रकट केला आहे हे बघणे महत्वाचे असते. थोडक्यात स्त्रिया, दलित, ब्लॅक सारे जण परिवर्तनवादी समीक्षेचा आग्रह धरीत आहेत.

उदाहरण घेऊन बोलायचे तर ‘बाळूताई धडा घे’ ह्या इंदिराबाई सहस्रबुद्धे ह्यांच्या कादंबरीत विवाहान्तर्गत बलात्काराला समाज मान्यता कशी मिळते हा विषय हाताळला गेला. ही कादंबरी अलीकडे कोणाला माहीतही नाही. तसेच ह्या कादंबरीनंतर लेखिकेने आणखी काही लिहिलेही नाही. ह्याच लेखिकेने ह्या कादंबरीपुर्वी एक कादंबरी इंग्रजीतून रुपांतरीत करून प्रसिद्ध केली, त्यातही विवाह न करता मातृत्व स्वीकारणाऱ्या स्त्रीची गोष्ट होती. इंदिराबाईंचे नाव मागे पडले हा काही केवळ अपघात नाही. (तसेच कोणाला प्रकाशक मिळतात कोणाला मिळत नाहीत ह्या मागेही एक कार्यकारण भाव दिसतो)

इंदिराबाईच्या लिखाणातून कोणत्या विसंगती होत्या ते दाखविले आहे. त्या काळात ह्या पुस्तकावर टीका झाली. कारण त्या काळातील वाचकांच्या अपेक्षांना ह्या पुस्तकाने धक्का दिला. मनोरंजकतेच्या अपेक्षा लोकांच्या प्रस्थापित वर्गाबरहुकूम असतात. त्या बदलू पाहणारे साहित्य नेहमीच कमी प्रमाणात लिहले जाते. पण निखळ समीक्षा करू पाहणाऱ्यांनी तरी ह्या पुस्तकातील आशयाला न्याय दिला का हा प्रश्न आहेच.
गीता साने ह्यांच्या लिखाणात तरी बंडखोरी होती. दिवाकर कृष्णांमध्ये तीही नव्हती तरी त्यांचेही लेखन लोकांपर्यंत पोहचले नाही. प्रकाशक वितरक ही यंत्रणा सर्वसामान्य अभिरुची उचलून धरते. म्हणून या पातळीवरही हस्तक्षेप होणे आवश्यक आहे.

नव्या वाङमयेतिहासाची गरज

तसेच काही साहित्यकृतीचे पुनरुज्जीवनही व्हायला हवे. नव्या चिकित्सक प्रस्तावना लिहून जे विसरले गेले आहे, दडपले गेले आहे ते पुनः एकदा प्रकाशात आले पाहिजे. खरे तर नवा वाङमयेतिहासही स्त्रीमुक्तिवादी दृष्टीकोनातून लिहिता येईल. रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, पंडित रमाबाई अशा स्त्रियांबद्दल अधिक संशोधन कारण त्यांची आयुष्ये केंद्रस्थानी ठेऊन इतिहास पुनः एकदा तपासता येईल.

हे करताना अतिरेक टाळता यायला हवा. तसेच पुनरुज्जीवन करताना चांगले दर्जेदार, सामाग्रताचे भान असलेले साहित्य पुनरुज्जीवित करावे असे वाटते. म्हणून अगदी महदंबेच्या ढवळ्यांपासून पुनः एकदा सर्व स्त्री-लेखिकांचे साहित्य वाचले पाहिजे. त्यांची संवेदनशीलता नव्याने प्रकाशात आणली पाहिजे.

स्त्री-पुरुष ह भेद सदासर्वकाळ गुलामगिरी- वर्चस्व ह्याच स्वरुपात होता असे मानणे चुकीचे होईल. म्हणून प्राचीन काळी स्त्रियांनी कर्त्या माणसाची भूमिका कशी बजावली हे पाहणे महत्वाचे आहे.

म्हणजेच ज्या ज्या स्त्रियांनी तत्कालीन कालासंकेताशी संघर्ष करून परंपरेला नवं रूप देण्याचा प्रयत्न केला असेल. त्यांच्या साहित्याचं पुनरुज्जीवन व्हायला हवं. ज्या लेखिका आहे ह्या चौकटीच मान्यता मिळविण्यासाठी प्रस्थापित मानदंड स्वीकारतात त्यांच्या लेखनाचा विचार करण्याचे कारण नाही.

संत साहित्यात येणारा परपुरुषाचा उल्लेख किंवा बहिणाबाईला झालेली मारहाण आणि तिने केलेला संघर्ष ह्याकडे आपण केवळ अध्यात्माच्या अर्थाने पाहू का? परपुरुष, रतणे, वेसवा हे शब्द पचवण्याची ताकद आज आपल्यात नाही हे सत्य आहे. म्हणून आपण बहिणाबाईंच्या धडपडीला अध्यात्मिक म्हणतो. खरे तर बहिणाबाईंची अनेक अंगांनी कोंडी झालेली दिसते. तिच्या जीवनात अनेक विसंवाद राहिले हेच तिचे मोठेपण आहे. ती स्त्री पुरुष देहाबद्दल प्रश्न विचारीत होती. अनेक दडपणामधून ती वाट शोधत होती.

आपण त्याकाळात निर्माण झालेल्या स्वैरिणी ह्या प्रतीकाचाही विचार केला पाहिजे. सौरी नावाचा रचना प्रकारही अस्तित्वात होता हे हेही लक्षात घेतले पाहिजे.

एका विशिष्ठ हेतूसाठी कलाकृती ताणून तीमधून अर्थ काढले जाऊ नयेत ह्याची दक्षता मात्र घेतली पाहिजे.

कोणत्याही साहित्याचे पुनरुज्जीवन करण्यापूर्वी एका प्रश्नाचा नीट विचार झाला पाहिजे. साहित्य माणसाच्या मनावर खोल संस्कार करते हे आपण मानतो कि नाही? एखादी गोष्ट सरळपणे सांगणे आणि त्याचे सर्व बाजूंनी दर्शन घडविणे ह्यात फरक असतो. साहित्याचे क्षेत्र व्यापक असायला हवं. कोणत्याही तत्वप्रणालीने, विचारसरणीने साहित्याचे बांधून टाकणे योग्य नाही.

काही वाङमयकृतींचे आकलन

आपण काही उदाहरणे घेऊन विचार करूया. ‘यमुना पर्यटन’ची स्त्रीमुक्तीवादी समीक्षा कशी होईल?

साहित्यातील स्त्री प्रतिमांचा अभ्यास करणे हा एक मार्ग असू शकेल. पण यमुना पर्यटन सारखी कादंबरी तशी निबंधावजा आहे. त्यातील स्त्री दुःखाचा विचार सामाजिक दृष्ट्या महत्वाचा आहे. पण त्या पलीकडे ह्या कादंबरीबद्दल काय बोलणार? बाबा पद्मनजी ह्यांनी स्त्री दुःखे फार बाहेरून पाहून उपरेपणाने मांडली आहेत असे आपण म्हणू शकू. बायकांची दुःखे आपल्याला माहिती आहेतच असे लेखकाने गृहीत धरले आहे. स्त्री शिक्षण, केशवपनाला विरोध, विधवा विवाह अशा उपायांनी स्त्री प्रश्न सुटणारच असे कादंबरीतून सूचित होते. स्त्रियांच्या जाणिवा-नेणिवांचा अंतर्मुख होऊन विचार केला गेला नाही म्हणून ही कादंबरी प्रचारात्मक वाटते.

पण ह्या समीक्षेला स्त्रीमुक्तीवादी समीक्षा का म्हणायचे?

कारण ह्यातील स्त्रिया आणि स्त्री-प्रधानता दया व करूणा ह्याच दृष्टीकोनातून आली आहे. हक्कांची जाणीव नवी आहे.

पहा म्हणजे यमुना पर्यटनचा लेखक कोण? स्वतः बाबा पद्मजी कि काळ? बाबा पद्माजींची कृती असेल तर ती त्यांची एकवटपणाला न पोचलेल्या मनाची कृती आहे असेच म्हणावे लागेल. सोयीने इतिहासाचा दाखला द्यावा सोयीने व्यक्तीच्या कर्तुत्वाचा गौरव करावा असे आपल्याला करता येणार नाही.

रणांगण : एकवटपणाचा प्रत्यय?

रणांगण कादंबरीची समीक्षा कशी केली जाईल? ह्या कादंबरीत तर युद्धखोरी हा पुरुषी अविष्कार आहे आणि स्त्रिया मुले त्यात बळी जातात असा स्पष्ट विचार आहे. स्त्रियांच्या हाती सत्ता आली तर जगात शांतता नांदेल असाही सूर आहे.हॅर्टाची युद्धाबद्दलची प्रतिक्रिया आणि जगातील स्त्रियांना एक होण्याचा संदेश स्त्रीमुक्तीवादीच आहे.

वर वर जरी हे खरे असले तरी रणांगणमधला चक्रधर काय प्रकारचा हिरो आहे हे पहिले पाहिजे. एक प्रेम भांगातून त्याचा सर्व स्त्री जातीवरचा विश्वास उडतो. मग तो मजा लुटत जगतो. इतरांना साधन बनवितो. त्याला टाळ्यावर आणायला हॅर्टासारखे निरागस, पवित्र व्यक्तिमत्व का आवश्यक वाटले? हॅर्टाने समर्पण करणे, नवजात अर्भकाप्रमाणे पवित्र, शुद्ध असणे, चक्रधाराच्या दृष्टीने महत्वाचे ठरते. याउलट मार्था मात्र बाजारू स्त्री म्हणून तिच्या विरोधात उभी केली आहे. तिला असा मृक्तीचा अनुभव का नाही? हॅर्टा आणि मार्था यांच्यात गुणात्मक फरक आहे असे मांडणे यात एक पुरुषी, नैतिक भूमिका आहे. त्यात चांगली स्त्री, वाईट स्त्री अशी तफावत केली आहे. लुईचे, शिंदे ह्यांचे भाव भावनांचे जग, बायकांचे आणि व्यापारी उलाढालीचे जग पुरुषांचे अशी विभागणी येथे पक्की दिसते. पतित मार्था पतित मार्गानेच जाणार असा नियती वाद का? हा प्रश्नही विचारला पाहिजे. हॅर्टाचे व्यक्तित्व हे लेखकाला एक आव्हान होते पण हॅर्टाला त्या मानणे वाढू दिले नाही म्हणून लेखकाला जे साधायचे आहे ते साधण्यासाठी कोणत्या युक्त्या त्यांनी योजिल्या, त्या मागची मूल्य व्यवस्था कोणती हे पहाणे महत्वाचे आहे. साहित्य आकृती सिद्ध होताना अर्थघनता का आक्रसली हे दाखविणे म्हणजे परिवर्तनवादी समीक्षा. त्या काळात ‘स्त्रीपणा’ आणि ‘पुरुषपणा’ कसा घडविला जात होता हे पहाणे महत्वाचे आहे.

पाश्चात्य स्त्रीमुक्तीवादी समीक्षा

पाश्चात्य देशात स्त्री मुक्तीवादी समीक्षेला वीस वर्षांपूर्वी सुरुवात झाली. सुरुवातीला वेगवेगळ्या लेखकांनी स्त्री प्रतिमा कशा रंगविल्या आहे याचा विचार झाला. नंतर समीक्षा खोल जाऊ लागली. ज्या साहित्यात स्त्रियांवर जुलूम झाला असे चित्रण होते त्यात स्त्रिया शक्तिशाली असल्याचा आशयही दडविलेला होता तो दाखवून देणे सुरु झाले. स्त्रिया म्हणजे असहाय्यपणे बळी जाणारा दुबळा घटक यापेक्षा काही वेगळे चित्र दिसते का ह्याचा शोध घेतला गेला. त्या मुळे अधःपतित स्त्रीच्या चित्रामध्ये ती दुबळी दिसली तरी बारकाईने पहिले तर तिचे दिशांना जोडलेले हात शक्तिशाली आहेत. अनेक जुन्या चित्रात स्त्रियांच्या आकृती स्थिर स्वरूपाच्या दाखवितात. त्यात त्यांची शक्ती दिसते अशा तऱ्हेने सामीक्षांनी फ्रँकन्सटाईन लिहिणाऱ्या मेरी शेलीच्या लेखनाचीही नवी समीक्षा केली. केवळ मनोरंजनासाठी लिहली गेली असे भासणाऱ्या या कादंबरीत त्यांना गंभीर आशय सापडला. शास्त्रज्ञ आणि त्यानी निर्माण केलेला राक्षक या प्रतिकांतून स्त्रियांना बुद्धिमंतांच्या जगात स्थान नव्हतं. आणि ते का नव्हतं असे प्रश्न विचारले. जेन आयरन मध्येही स्त्रियांनाही वासना असतात हे दाखवण्यासाठी बर्था हे व्यक्तित्व निर्माण केले. म्हणजेच स्त्री लेखिका छुप्या पद्धतीने लिहित होत्या असे समीक्षकांनी दाखविले. जहाल स्त्रीमुक्तीवाद्यांनी तर नवी भाषा निर्माण करण्याचाही प्रयत्न केला. स्त्रियांचे अनुभव पुरुषांपेक्षा वेगळे आहेत पण गौण नाहीत असे त्यांनी मांडले.

पण इथे आपण सावध असले पाहिजे. ज्या स्त्रीवाद्यांनी परिवर्तनवादी भूमिका सोडली. व्यक्तीवादी समजात आणखी व्यक्तिवादाची भर त्यांनी घातली. केवळ मोड तोड करणे आणि घात पती लढाया खेळणे यात धोका असतो. या मुळे समाज विरोधी भूमिका घेतल्या जातील.अनेक सामाजिक कोंड्यांमध्ये स्त्रीची कोंडी होते. हे म्हणणे आणि आणि केवळ स्त्रियांच्या कोंडीचा विचार करून बारीक सारीक लढाया करणे यात फरक आहे. समग्र माणूस होण्याची ही लढाई आहे हे विसरता येत नाही.

'उत्तम' गौरविलेल्या लेखनातील स्त्री पात्रांचा अभाव

आपण पुन्हा एकदा मराठी साहित्यांकडे वळूया. लेखक पात्र निर्माण करतो. आणि काही वेळा ते पात्र लेखकाच्याही नकळत त्याला वेगळ्या दिशेने खेचते. अशा प्रतिभेच्या चमत्कृतीला आपण काही स्थान देणार कि नाही? म्हणजेच लेखकाचा कलात्मक हेतू आणि प्रत्यक्ष पात्र निर्मिती ह्या दोन परिमाणांचे भान ठेऊन आपण समीक्षा करायला हवी. अनेक लेखक आपल्या लेखनातून स्त्री पात्र टाळतात आणि तरीही त्यांचे साहित्य उत्तम दर्जाचे असू शकते किंवा पानवलकारांसारख्यांच्या साहित्यात स्त्री पात्रे अत्यंत दुय्यम पात्रे म्हणून येतात आणि जी स्त्री पात्रे येतात ती सांकेतिक चौकटीतच रंगविली जातात असे दिसते. मग आपण पानवलकारांचे व अश्या लेखकांचे मूल्यमापन कसे करू. विलास सारंग यांच्या लेखनातही स्त्री पात्रे अशीच सोयीने येतात.

इथे पानवलकरांनी स्त्री जीवन जाणण्याची धडपड केली नाही असे म्हणावे लागेलही त्यांची उणीव आहे. कलावंत आणि व्यक्ती म्हणून पुरुष लेखक जसे घडतात त्या घडणीच्या प्रक्रियेतील ही कमतरता आहे. ह्या लेखकांच्या इतर जाणीवा, जीवनाचे भान वाढते पण स्त्रीविषयी मात्र त्यांनी जैसे थे पद्धतीनेच विचार केला, असे का होते? म्हणून आपण सांस्कृतिक संदर्भ तपासणे महत्वाचे वाटते.

भालचंद्र नेमाडे वेगैरे लेखकांमध्ये तर एक त-हेचा तुच्छतेचा दृष्टीकोन दिसतो. आधुनिक स्त्री त्यांना बाहेरून दिसते पण समजत नाही. ही स्वतंत्र घर संसार नसलेली आपल्या कामांमध्ये रस घेणारी बाई त्यांना जिवंत माणूस म्हणून जाणवत नाही. श्रुंगाराविषयी लिहणाऱ्या सर्व लेखकांचा उपहास करणारे नेमाडे स्वतः एका कोंडीत सापडल्या सारखे वाटतात. मादीपणा करणाऱ्या, मुलं जन्माला घालणाऱ्या बायका त्यांना बिनडोक वाटतात. तसे न करणाऱ्या अमानवी वाटतात. बऱ्याचशा नव्या लेखकांच्या लिखाणात स्त्रियांचा अभाव आहे. कारण फार झपाट्याने स्त्रियांची आणि पुरुषांची जग विलग होत आहे.दोन विलग बेटांवर ते जणू राहत आहेत. त्यामुळे स्त्री विरहित जग निर्माण केले जात आहे.

नेमाड्यांच्या कादंबऱ्यांतून स्त्री जीवन अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न दिसतो. स्वतःच्या अनुभवाच्या मर्यादा जाणून नेमाडे ह्यांनी स्त्रीच्या अनुभव विश्वाला हात घातला नाही. असे असले तर तो एक शहाणपणा, प्रामाणिकपणा मानवा लागेल. पण एकूण समर्थ म्हणविणाऱ्या ह्या लेखकांना स्त्री जीवनातील बदलते आशय व आकांश समजून घेण्याचे कष्ट घ्यावेसे का वाटत नाही? ज्या प्रमाणात स्त्रिया समाजात खऱ्या अर्थाने जिवंत होत चालल्या आहेत त्या प्रमाणात साहित्य क्षेत्रात पुरुष लेखकांच्या जडण घडणीत कॅस्ट्रेशन कॉम्प्लेक्स व्यक्त होऊ लागला आहे. काल परवा पर्यंत लेखकांचा दावा होता कि सर्व तरल अनुभव जाणण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. आज नेमके स्त्री पुरुष संबंधांच्या ह्या कडीच्या क्षेत्रात हे समर्थ लेखक का चाचपडतायत. आधुनिक समर्थ स्त्रीशी ह्यांची पात्रे जरा बोलतात तरी पण जिला प्रगल्भता नाही अशा स्त्री चित्रणात हे इतके माघार का घेतात? लेखक म्हणून त्यांच्या वर कोणते दडपण असते? स्त्री मुक्तीवादी समीक्षेने याची नोंद घेणे आवश्यक वाटते. नेमाडे ह्यांच्या सर्व कादंबऱ्यांमधून एक पुरुषांपुरुषांमधील संबंधांचा दृष्टीकोन (समलिंगी) प्रतिबिंबित होतो. स्त्रीमुक्तिवादी स्त्रिया त्यांच्या चळवळीचा एक भाग म्हणून लेस्बियन जाणीव उचलून धरतात. पण पुरुषांच्या जगात मात्र हे नकळतपणे आळून येते. आपल्याकडे लैंगिक जीवनाकडे पाहण्याचा जो कातरपणा आहे त्या कडे चिकित्सक दृष्टीने पहिले पाहिजे. एका समिक्ष काळात प्रवेश केल्या नंतर येणारे प्रश्नही गुंतागुंतीचेच असणार. लेखक म्हणून नेमाडे अपुरे पडल्याचे जाणवले तसे म्हटले पाहिजे. नेमाडे ह्यांच्या कादंबऱ्या सुंदर कृती म्हणून नावाजल्या गेल्या तरी त्या अभिजात ठरणार नाही.

असेही लक्षात येते कि मोठे मोठे लेखक हुंडा, सती, अशा सामाजिक प्रश्नांबाबत हिरीरीने बोलतात. पण प्रत्यक्ष जीवनातले स्त्री पुरुषांच्या वाट्याला येणारे भिन्न अनुभव त्यांना महत्वाचे वाटत नाही. अशा लेखकांच्या कृती अभिजात का मानायच्या?

स्त्री परिचयाबाबत उपेक्षा

इथे दोन प्रश्न गुरफटलेले आहेत असे दिसते. अत्यंत संवेदनशील लेखकवर्गातील पुरुषांचे आणि वर्गातील स्त्रियांचे आज नाते कसे दिसते? स्त्रीचा त्यांचा परिचय कसा आहे? तो जसा आहे त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या कलाकृतीत उमटते. पु. शि रेगे ह्यांचे सर्व साहित्य स्त्रीत्वाच्या भोवती आहे. त्यात स्त्रीच्या शरीर अनुभवालाही अभिव्यक्त केले आहे. हे चित्रण स्त्रीमुक्तीवादाला आपले वाटते का?

वाटत नसावे असे वाटते. दलित क्रांतीचा अंतिम टप्पा नष्ट होणे हा असेल त्याचप्रमाणे सती क्रांतीला स्त्री पुरुषांमधील विषमता भेद नष्ट करण्यात रस असतो. म्हणून रेगे नावाच्या लेखालाच्या लेखनाचा वेध घेतानाही अनुभव मांडताना रेगे काय मांडतात, काय गळतात हे पाहावे लागेल. स्त्री देहाचे गूढत्व जर निर्माण केले गेले असेल तर त्याची चिकित्साही करावी लागेल.

अलीकडे ब-याच स्त्रिया नव्याने आपल्या जुन्या आयुष्याकडे पाहू लागल्या आहेत. त्या मुळे काही गोष्टी धीटपणे मांडल्या जाऊ लागल्या आहेत. बाईपणा भोवती असणाऱ्या मिथ्स फोडल्या जात आहेत. मुल हवंसं वाटणं, आपलं घर हवंसं वाटणं ह्या पलीकडे जाणारी बाई आपलं बाईपण नव्याने व्यक्त करते आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रसूती, गर्भारपण ह्या विषयी वेगवेगळ्या दृष्टीकोणातून पाहता येते. हा अनुभव सतीचा स्वतःचा असतो पण तो तिला किती प्रमाणात हवा तसा घेता येतो आणि मांडता येतो? विजया राजाध्यक्षांनी हा शरीर अनुभव निःसंकोचपणे मांडला, पूर्वी असे लिहिले जात नसे.

स्त्रियांचे अनुभव फक्त स्त्रियांनीच लिहावे असा आग्रह योग्य नाही. किंबहुना गर्भधारणेसारखा अनुभव सर्व स्त्रियांनी त्याचप्रकारे येतो असे मुळीच नाही. कोणाला ती जखडून टाकणारी घटना वाटेल, कोणाला सार्थक करणारी वाटेल. पण इतकेच नाही तर गर्भधारणेचा अनुभव नसणाऱ्या पुरुषाला वाटणारे एकाकीपण हाही स्त्रियांच्या लेखनाचा आस्थेचा भाग झाला पाहिजे. आपल्याला स्त्रिया आणि पुरुषांचे कप्पेबंद जगणे मान्य नाही हीच भूमिका घ्यावी लागेल. ह्या दृष्टीने समीक्षेचीही समीक्षा करावी लागेल.

पानवलकरांसारख्या लेखकाची समीक्षा करताना सहजपणे मांडलं जातं कि त्याचा जग पुरुषी आहे. रिक्षाड्रायव्हर, पानवाला इत्यादींचे जग दाखविताना आलेला एकारलेपणा गौरव म्हणून मांडला जातो. पण ही त्यांची तरीतू आहे असे कोणी म्हणत नाही.

अशातऱ्हेची समीक्षा इंग्रजीत झाली आहे. त्यात समीक्षेच्या चार दिशा दिसतात. देहात्मक, भाषिक, मनोविश्लेषणात्मक आणि सांस्कृतिक अशा चार अंगांनी ही समीक्षा केली जाते.

काही स्त्रियांच्या साहित्याचा नव्याने विचार

आपल्याकडे कमाल देसाईंच्या लेखनाचा विचार ह्या संदर्भात आवर्जून व्हायला हवा. त्यांची स्त्री पात्रे कणखर, भांडखोर आणि स्वत्व शोधणारी असतात. त्यांची एक कथा नायिका साधी शिक्षिका आहे. तिला कुटुंबातले, शैक्षणिक क्षेत्रातले क्रौर्य दिसते, अपरिपक्व स्त्रीपुरुषांच्या जगात गुदमरणारी मुळे दिसतात. ही जमदग्नीचा अवतार धारण करणारी स्त्री स्वतंत्र्याशील आहे. हॅट, घालणारी बाईही स्त्री देह आणि माणूस म्हणून प्रकल्प करणारी स्त्री ह्यांमधील तणावांचे दर्शन घडविते. कमल देसाईंची रुपवादी समीक्षा झाली. पण स्त्रीमुक्तीवादी समीक्षा झाली नाही. ह्यातील स्त्रीचा मृत्यूही फार फार स्वातंत्र्यशील आहे.

आणखी एका अंगाने विचार व्हायला हवा. तो म्हणजे स्त्रियांच्या कामाच्या गतीचा, तालाचाही स्त्रियांच्या जाणिवानेणिवांशी जवळचा संबंध असतो. लेखनातून हे कसे येते हे पहाणे आवश्यक आहे.

तसेच भाषेचाही विचार व्हायला हवा. काही प्रमाणभाषेतून सवयीने येतात. काही वेळा नव्या आशयासाठी भाषा निर्मिली जाते. अनेक लेखकांनी भाषेची तोडमोड केली असे म्हटले जाते. त्यांच्या प्रयोगांमधून कोणतं नवा आशय मांडला गेला, कोणत्या नव्या जाणीव आल्या हे पाहिले पाहिजे. म्हणजे मग केवळ प्रयोग म्हणून केलेली तोडमोड कोणती आणि अस्सल कोणती ह्याचाही छडा लागेल.

जुन्या लेखकांचे नवे वाचन करताना अनेक चांगले शोध लागण्याची शक्यता आहे. लक्ष्मीबाई टिळकांच्या, रमाबाई रानडे ह्यांच्या जगण्यातल्या व्यथा पुढे मांडता येतील. निसर्गावर प्रेम करणारे बालकवी बायकोला मारत असत? सुधारकांना बायकांनी शिकावे असे वाटले तेव्हा त्यांच्या पुढे गोऱ्या पाश्चात्य स्त्रिया होत्या कि नव्हत्या असे प्रश्न विचारले गेले पाहिजेत. सभासंमेलनात आपल्या घरची स्त्री आल्याने आपली प्रतिष्ठा वाढते असे सुधारक पुरुषांना वाटत होते का?

सुधारकांना भावलेली स्त्रीमुक्ती

म्हणजेच पूर्वी सनातन्यांनी सुधारकांवर केलेले आरोप स्त्रीमुक्तीवाद्यांना आता अभ्यासावे लागणार आहेत. सुधारक वसाहतिक बाहुल्या तयार करत होते हा सनातन्यांचा आरोप स्त्रीमुक्तीवाद्यांनी विचारात घेतला पाहिजे. सनातन्याचे मार्ग कालबाह्य असतील पण त्यांचे साहित्यही स्त्रीमुक्तिवादी समीक्षेला कदाचित मदत करेल. कारण मडमिणीपेक्षा इथल्या स्त्रिया अधिक समर्थ होत्या असा त्यांचा डावा होता. हे तपासून घ्यावे लागेल. तसेच सुधारणावादी चळवळीतून घडविली गेलेली ‘स्त्री’ पुनः एकदा पारखून घ्यावी लागेल.

निष्कर्ष

स्त्रीमुक्तीवादी साहित्य समीक्षेला मूलतः परिवर्तनवादी असते आणि त्या अर्थी समाजभिमुख असते ह्यावर सर्वांचे एकमत झाले. केवळ स्त्रीप्रधानता हा निकष न मानता त्या त्या साहित्यकृतीतून दिसणारी मूल्यव्यवस्था तपासून पहाणे हे गरजेचे आहे असेही एकमताने मान्य झाले. काळाच्या पडद्याआड दडलेल्या, विसरल्या गेलेल्या साहित्यकृती आणि आणि सती लेखिका ह्यांना पुनरुज्जीवित करणे हे काम हाती घ्यावे असे उपस्थित व्यक्तींना वाटले. स्त्रीमुक्तीवादी चळवळ आणि ललित साहित्यातील, भाषेतील, संस्कृतीतील पुरुषप्रधानता उघडकीस आणणे हे एकच मार्गाने हातात हात घालून जावयास हवे.

ह्या चर्चेतून नव्या समीक्षेच्या अनेक वाटा सूचित झाल्या तरी त्यावर तपशीलात चर्चा होऊ शकली नाही. विशेषतः संत साहित्यातून दिसणारा संत कवयित्रींचा संघर्ष आणि त्याची अभिव्यक्ती ह्याचे अर्थ लावताना कोणत्या काळज्या घेतल्या पाहिजेत ह्यावर एक वेगळाच चर्चासत्र घ्यायला हवे असे सर्वांनाच वाटले. १९ व्या शतकातील सुधारणावादी चळवळींतून स्त्री-सुधारणाविषयक जे विचार आले त्याबद्दलही पुनर्विचार करणे आणि त्या प्रक्रियेतील पुरुषप्रधानता उघडकीस आणणे हे करण्यासाठी इतिहासाचा पुनः एकदा नव्या दृष्टीने वेध घेतला पाहिजे, ह्या साठीही वेगळे चर्चासत्र घ्यावे असे मत व्यक्त झाले. उघड उघड स्त्रीमुक्तीवादी नसलेले पण दुय्यम स्थानी असल्याने तिच्या जगण्याची गुंतागुंत स्पस्थ करणारे साहित्य संकलित करणे महत्वाचे आहे ह्या बद्दलही अधिक तपशिलात चर्चा हवी असे मत व्यक्त झाले.

( ही ध्वनीमुद्रित चर्चा लिहून काढण्याचे कष्टाचे काम लीलावती भागवत यांनी केले)

Previous Post Next Post